घरातले लोक दीर्घकाळासाठी बाहेर किंवा गावाला गेलेले असतील तर अशा घरांमध्ये चोरी किंवा घरफोडी घडण्याची शक्यता अधिक आहे. त्यामुळे लोक आपल्या घराच्या सुरक्षेसाठी अनेक उपाय करतात. एक अतिरिक्त लोखंडी दरवाजा बसवून घेतात. कुलुपांची संख्या वाढवितात. सीसीटीव्ही कॅमेरे बसविले जातात. ते बसविल्यास आपण कोठेही असला तरी मोबाईल अॅपच्या माध्यमातून आपण आपल्या घरावर लक्ष ठेवू शकता. इतरही अनेक उपाय केले जातात.
सध्या सोशल मिडियावर एका व्यक्तीने आपल्या घराचे चोरांपासून संरक्षण करण्यासाठी केलेला एक अजब प्रकार प्रसिद्ध होत आहे. या व्यक्तीने गावाला जाताना आपल्या घराच्या प्रवेशद्वारावर एक पोस्टर चिकटविले आहे. या पोस्टरवर चोरांसाठी एक संदेश आहे. या व्यक्तीचे नाव समजत नसले, तरी ती कानपूरची असल्याचे दिसून येते. या व्यक्तीने चोरांसाठी जो संदेश पोस्टरवर लिहिला आहे, तो गंमतशीर आहे. ‘चोरांसाठी निवेदन’ असा प्रथम ठळक अक्षरात मथळा आहे. त्यानंतर ‘आम्ही गावाला जात आहोत. घरात केवळ कामवाली आणि तिच्यासह तीन पिसाळलेले कुत्रे आहेत. ते अत्यंत चावरे असून त्यांचा चावा विषयुक्त आहे. मला दोन अंगठ्या हुंड्यात मिळाल्या होत्या. त्या मी बोटांवर चढवूनच बाहेर पडत आहे. त्यामुळे या घरात चोरी करण्याचे कष्ट उठविणे निरर्थक आहे. आपण आजूबाजूच्या घरांमध्ये प्रयत्न करु शकता.’ असा हा संदेश आहे. सध्या हे पोस्टर आणि त्यावरील संदेश चांगलाच लोकप्रिय झाला आहे. हजारो व्ह्यूज या संदेशाला मिळाले आहेत. अनेकांनी टिप्पणीही पोस्ट केल्या आहेत. या व्यक्तीने चोरांसाठी चहा नाष्त्याची सोय गावाला जाण्यापूर्वी करुन ठेवावी. म्हणजे या घरात काहीही मिळाले नाही, हे त्यांचे दु:ख काही प्रमाणात तरी कमी होईल, अशी स्वारस्यपूर्ण टिप्पणी एकाने केली आहे. एकंदर, हे पोस्टर सध्या गाजत आहे.









