मोठ्या संख्येने सहभागी होण्याचा कार्यकर्त्यांचा निर्धार : भाषिक अधिकारांसाठी गावोगावी जागृती, अनेक भागातील नागरिकांचा पाठिंबा
बेळगाव : कन्नड सक्तीच्या माध्यमातून प्रशासनाने मराठी भाषिकांना डिवचण्याचा प्रयत्न केला. भाषिक अधिकारांवरच घाला घालण्यात आल्याने सोमवारी मराठी भाषिकांचे शक्ती प्रदर्शन होणार आहे. प्रशासनाला मराठी भाषिकांची ताकद दाखवून दिली जाणार असून सकाळी 11 वाजता मोठ्या संख्येने उपस्थित राहण्यासाठी शहरासह गावागावात जागृती करण्यात आली. रविवारी साप्ताहिक सुटी असल्यामुळे घरोघरी जाऊन म. ए. समितीच्या पदाधिकाऱ्यांनी जागृती केली.
वडगाव, जुने बेळगावमध्ये जागृती
कन्नड सक्ती विरोधात मराठी भाषिकांनी जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देण्याचा निर्णय घेतला आहे. आपल्या भाषिक अधिकारांसाठी सोमवार दि. 11 रोजी जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देण्यात येणार असून अधिकाधिक मराठी भाषिकांनी यावेळी उपस्थित राहण्याचे आवाहन म. ए. समितीचे नेते रमाकांत कोंडुसकर यांनी केले. रविवारी वडगाव येथील ज्ञानेश्वर मंदिरात वडगाव व जुने बेळगाव येथील कार्यकर्त्यांची बैठक पार पडली. यावेळी त्यांनी कार्यकर्त्यांना मार्गदर्शन केले. यावेळी माजी नगरसेवक मनोहर हलगेकर, कीर्तीकुमार कुलकर्णी, दिलीप नाईक, ज्ञानेश्वर मण्णूरकर, उमेश पाटील, संतोष शिवणगेकर, महेश जुवेकर, भाऊ पाटील, जोतिबा कुंडेकर, पिंटू कुंडेकर, दीपक देसूरकर, रणजित चव्हाण-पाटील यांच्यासह मोठ्या संख्येने वडगाव व जुने बेळगाव येथील कार्यकर्ते उपस्थित होते.
अनगोळ, खादरवाडी,मजगाव परिसरात पाठिंबा
महामोर्चासंदर्भात रविवारी अनगोळ, खादरवाडी, देसूर, मजगाव परिसरात म. ए. समितीचे नेते रमाकांत कोंडुसकर यांनी जागृती केली. तेथील कार्यकर्त्यांनी महामोर्चाला पाठिंबा देत मोठ्या संख्येने ग्रामीण भागातील युवक सहभागी होतील, असे आश्वासन देण्यात आले. मराठी भाषा आणि संस्कृतीच्या रक्षणासाठी आंदोलन महत्त्वाचे असून मराठी भाषिकांनी अधिकाधिक संख्येने सहभागी होण्याचे आवाहन करण्यात आले.
मच्छे-पिरनवाडी भागात पत्रकांचे वाटप
महाराष्ट्र एकीकरण युवा समिती सीमाभागाच्यावतीने रविवारी मच्छे, पिरनवाडी या भागात पत्रक वाटून मोर्चाची जागृती करण्यात आली. येथील ग्रामस्थांनी म. ए. समितीला पाठिंबा देत मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आश्वासन दिले. अध्यक्ष शुभम शेळके, कार्याध्यक्ष धनंजय पाटील यांच्या नेतृत्वाखाली व्यापारी तसेच नागरिकांना सहभागी होण्याचे आवाहन करण्यात आले.
शिवसेनेचा जाहीर पाठिंबा
कन्नड सक्तीमुळे मराठी भाषिकांची गळचेपी होत आहे. दिवसेंदिवस कन्नड सक्तीचा बडगा अधिकच तीव्र केला जात असल्याने मध्यवर्ती म. ए. समितीने आंदोलनाची हाक दिली आहे. या आंदोलनाला शिवसेना सीमाभागाच्यावतीने पाठिंबा देण्यात आला असून मोठ्या संख्येने शिवसैनिक या लढ्यामध्ये सहभागी होतील, असा विश्वास जिल्हाप्रमुख प्रकाश शिरोळकर यांनी व्यक्त केला.









