सीमाप्रश्नाबाबत महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांना भेटणार : बैठकीत विविध विषयांवर चर्चा
खानापूर : महाराष्ट्र सरकारने उच्चाधिकारी समितीची नियुक्ती केली असून सीमाप्रश्नाला बळकटी देण्याचे काम महाराष्ट्र सरकारने केले आहे. त्याबद्दल खानापूर म. ए. समितीच्यावतीने महाराष्ट्र सरकारचे अभिनंदन करत आहोत. तसेच खानापूर तालुक्यातील रस्त्यांची समस्या, खंडित वीजपुरवठ्याची समस्या आणि सरकारी इस्पितळात मराठी फलक याबाबत सोमवार दि. 30 रोजी संबंधित अधिकाऱ्यांना निवेदन देऊन त्याचा पाठपुरावा करणे गरजेचे असल्याचे प्रतिपादन माजी आमदार दिगंबर पाटील यांनी केले. ते शुक्रवारी खानापूर येथे झालेल्या खानापूर तालुका म. ए. समितीच्या बैठकीत बोलत होते. बैठकीच्या अध्यक्षस्थानी समितीचे अध्यक्ष गोपाळ देसाई होते.
प्रास्ताविक आणि स्वागत आबासाहेब दळवी यांनी केले. यावेळी दिवंगतांना श्रद्धांजली वाहण्यात आली. यावेळी कार्याध्यक्ष मुरलीधर पाटील म्हणाले की, सीमाप्रश्नाबाबत बळकटी आणायचे असेल तर महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना भेटणे गरजेचे आहे. त्यासाठी अध्यक्ष गोपाळ देसाई व माजी आमदार यांच्या नेतृत्वाखाली ऑगस्ट महिन्यांमध्ये खानापूर समितीच्या पदाधिकाऱ्यांनी भेटीचे नियोजन करावे. त्यासाठी मध्यवर्ती समितीला कल्पना देऊन पुढील कार्यवाही करावी, असेही त्यांना सुचित करण्यात आले. त्याला सर्वांनी पाठिंबा दिला. गोपाळ पाटील म्हणाले की, उच्चाधिकारी समितीची स्थापना करण्यात आली आहे.
या अगोदर सदर समितीत 5 सदस्य होते. आता जवळपास सर्वपक्षीय 18 सदस्यांची उच्चाधिकारी समितीमध्ये नियुक्ती केली आहे. उच्चाधिकारी समितीच्या अध्यक्षपदी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस असले तरी तज्ञ समितीच्या अध्यक्षपदी जयंत पाटील यांची नियुक्ती करावी, असा ठराव त्यांनी मांडला. त्या ठरावाला समितीच्या पदाधिकाऱ्यांनी पाठिंबा दिला. अध्यक्ष गोपाळ देसाई म्हणाले की, मध्यवर्ती समितीच्या सूचनेनुसार आणि त्यांना पाठबळ देण्यासाठी मध्यवर्तीच्या सदस्यांनी नियमितपणे बैठकीला हजर राहून समस्या सोडवण्याबाबत पुढाकार घ्यावा. यावेळी रुक्माण्णा झुंजवाडकर व इतरांनी आपले मनोगत व्यक्त केले.
यावेळी मध्यवर्तीच्या सदस्यपदी वसंत नावलकर, राजाराम देसाई, विठ्ठल गुरव, मऱ्याप्पा पाटील यांची निवड करण्यात आली तर तालुका कार्यकारिणीवर भीमसेन करंबळकर यांची निवड झाली. बैठकीला विठ्ठल गुरव, प्रकाश चव्हाण, पांडुरंग सावंत, अजित पाटील, रणजीत पाटील, डी. एम. भोसले, भीमसेन कंरबळकर, संजीव पाटील, राजाराम देसाई, कृष्णा कुंभार, ब्रह्मानंद पाटील, वसंत नावलकर, सुधीर नावलकर, म्हात्रू धाबले, शंकर गावडा, मऱ्याप्पा पाटील व समितीचे सदस्य उपस्थित होते.









