तात्काळ उपाययोजना करण्याची मागणी : इतर खात्यांच्या सरकारी अधिकाऱ्यांनाही दिली निवेदने
खानापूर : खानापूर तालुका म. ए. समितीच्यावतीने सोमवार दि. 30 रोजी तालुक्यातील विविध समस्यांबाबत आणि मराठी फलकाबाबत तहसीलदार कार्यालय, सार्वजनिक बांधकाम विभाग, हेस्कॉम, आरोग्य विभाग आणि बस व्यवस्थापक यांना निवेदन देण्यात आले आहे. सदर समस्यांबाबत योग्य ती उपाययोजना त्वरित करावी, अशी मागणी करण्यात आली आहे. तहसीलदार कार्यालयात माजी आमदार दिगंबर पाटील यांनी ग्रेड टू तहसीलदार राकेश बुवा यांच्याकडे निवेदन सादर केले आहे निवेदनात म्हटले आहे की, पावसाळ्यात बहुतांश भागातील अनेक विद्युतखांबांचे मोठ्याप्रमाणात नुकसान झाले आहे. ज्यामुळे अनेक गावांमध्ये वारंवार आणि दीर्घकाळ वीजपुरवठा खंडित होत आहे. संबंधित विभागाला अखंडित वीजपुरवठा सुनिश्चित करण्यासाठी खराब झालेले विद्युतखांब लवकरात लवकर पुन्हा बसवण्याचे निर्देश द्यावेत, सततच्या पावसामुळे तालुक्यातील गावांना जोडणाऱ्या रस्त्यांवर मोठेमोठे खड्डे पडले असून दैनंदिन वाहतूक आणि आपत्कालीन सेवांवर गंभीर परिणाम झाला आहे.
तसेच असोगा गावाकडे जाणाऱ्या रस्त्यावर रेल्वे विभाग भुयारी मार्ग करीत असून हा रस्ता खचला आहे. यामुळे प्रवास करणे धोकादायक आणि कठीण झाले आहे. हा रस्ता बंद होण्याच्या मार्गावर आहे. तरी हा रस्ता आणि इतर रस्ते पुन्हा बांधण्याची आणि दुरुस्त करण्याची मागणी करण्यात आली आहे. आता शैक्षणिक वर्ष सुरू झाल्याने काही गावात बसेस वेळेनुसार येत जात नसल्याने विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होत आहे. शाळा व महाविद्यालयांच्या वेळेनुसार बसेसच्या वेळापत्रकात बदल करावे. आणि खानापूर तालुक्यातील 90 पेक्षा जास्त लोक मराठी भाषिक आहेत. त्या स्थानिक लोकांच्या सोयीसाठी सरकारी रुग्णालयात कन्नडसह मराठी भाषेत सूचना आणि दिशादर्शक फलक लावण्याच्या मागणीचे याअगोदरही निवेदन देण्यात आले आहे. तरी तालुक्यातील लोकांच्या सुरक्षिततेसाठी, शिक्षणासाठी आणि कल्याणासाठी या सुधारणा अत्यंत महत्त्वाच्या आहेत. त्या तातडीने सोडवा. जेणेकरून याचा फायदा नागरिकांना मिळेल, असे म्हटले आहे. निवेदन देताना माजी आमदार दिगंबर पाटील, कार्याध्यक्ष मुरलीधर पाटील, आबासाहेब दळवी, संजीव पाटील, गोपाळ पाटील, पांडुरंग सावंत, कृष्णा मनोळकर, अरुण देसाई व कार्यकर्ते व नागरिक उपस्थित होते.









