सर्वपक्षीय नेत्यांचा पाठिंबा : समितीच्या शिष्टमंडळातर्फे विविध नेत्यांना निवेदन
बेळगाव : हुतात्मा दिनानिमित्त आज शुक्रवारी महाराष्ट्र सरकारला सीमाप्रश्नी जाग आणण्यासाठी आणि सीमाप्रश्नाला चालना मिळावी यासाठी मध्यवर्ती म. ए. समितीच्यावतीने कोल्हापूर जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन केले जाणार आहे. सीमावासियांच्या धरणे आंदोलनाला कोल्हापुरातील सर्वपक्षीय नेतेमंडळींनी सक्रिय सहभाग नोंदवून पाठिंबा द्यावा, यासाठी समितीच्या शिष्टमंडळांनी महाराष्ट्रातील विविध नेतेमंडळींची गुरुवारी भेट घेऊन निवेदन दिले. शिष्टमंडळात तालुका म. ए. समितीचे कार्याध्यक्ष आर. एम. चौगुले, नगरसेवक रवी साळुंखे, युवा समितीचे सरचिटणीस श्रीकांत कदम, एन. के. कालकुंद्री, निपाणी तालुका म. ए. समितीचे अध्यक्ष अजित पाटील, कार्याध्यक्ष बंडा पाटील, युवा समितीचे उपाध्यक्ष गुंडू कदम यांनी कोल्हापूरचे खासदार छत्रपती शाहू महाराज, खासदार धैर्यशील माने, मंत्री हसन मुश्रीफ, कोल्हापूर भाजप ग्रामीण अध्यक्ष नाथाजी पाटील, जिल्हाध्यक्ष राहुल चिकोर्डे, महानगर अध्यक्ष विजय जाधव, मनसे शहर प्रमुख दिंडोरले यांच्यासह सर्वपक्षीय नेतेमंडळींची भेट घेऊन निवेदन देण्यात आले. यावेळी खासदार शाहू महाराज यांनी धरणे आंदोलनाला पाठिंबा देत सहभागी होणार असल्याचे सांगितले. तसेच दिल्ली येथे केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची भेट घेऊन सीमाप्रश्नाचा लवकरात लवकर सोक्षमोक्ष लावावा, अशी मागणी करणार असल्याचे सांगितले. तसेच महाराष्ट्र सरकारची उदासीनता पाहून नाराजी व्यक्त केली. खासदार धैर्यशील माने यांनीदेखील सहभागी होणार असल्याचे कळविले आहे. सर्वपक्षीय नेत्यांनी आजच्या म. ए. समितीच्या आंदोलनाला पाठिंबा व्यक्त केल्यामुळे सीमाभागातील मराठी भाषिकांना बळ प्राप्त झाले आहे.









