कानडीकरणाला विरोध-मराठी कागदपत्रांच्या मागणीमुळे अप्पर जिल्हाधिकाऱ्यांकडून मनपाला पत्र?
बेळगाव : महापालिकेतील कानडीकरणाला विरोध व मराठी कागदपत्रांची मागणी केल्याने म. ए. समितीचे नगरसेवक रवी साळुंखे व त्यांच्या सहकाऱ्यांचे सदस्यत्व रद्द करण्यात यावे, अशी मागणी कन्नड संघटनांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे केली होती. त्यानुसार अप्पर जिल्हाधिकारी विजयकुमार होनकेरी यांनी नगरसेवक रवी साळुंखे व इतरांचे सदस्यत्व रद्द करण्यासंदर्भात चौकशी करून माहिती द्यावी, असे पत्र महापालिकेला पाठविल्याचे विश्वसनीय सूत्रांकडून समजते. या प्रकारामुळे मनपा वर्तुळात खळबळ उडाली आहे.
कर्नाटक सरकारने सर्व शासकीय कार्यालयात कन्नड भाषेचा प्रभावीपणे वापर करण्यात यावा, असा आदेश बजावल्याने मनपा आयुक्त शुभा बी. यांनी महापालिकेतील इंग्रजी व मराठी भाषेतील फलकांवर पांढरा कागद चिकटविला. केवळ कन्नड भाषेतील फलकच ठेवण्यात आले आहेत. यापूर्वी महापालिकेकडून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी केली जात होती. त्यानुसार विविध कक्षांबाहेर तिन्ही भाषांतील फलक लावण्यात आले होते. इतकेच नव्हेतर सर्वसाधारण सभेची नोटीसदेखील कन्नड, इंग्रजी व मराठी भाषेतूनही दिली जात होती. पण अलीकडेच भाषांतरकार नसल्याचे कारण देत केवळ कन्नड व इंग्रजी भाषेतूनच नोटीस देण्यात येत होती.
याबाबत म. ए. समितीचे नगरसेवक रवी साळुंखे, शिवाजी मंडोळकर व वैशाली भातकांडे यांनी आपल्या मातृभाषेतूनही सभेची नोटीस द्यावी, अशी मागणी केल्याने मध्यंतरी नोटिसीचे अनुवाद केलेली कॉपी मराठी नगरसेवकांना देण्यात आली होती. सरकारच्या आदेशानंतर महापालिकेत कानडीकरणाचा वरवंटा तीव्र करण्यात आल्याने याविरोधात नगरसेवक रवी साळुंखे, शिवाजी मंडोळकर व वैशाली भातकांडे यांनी जोरदार आवाज उठविला होता. त्यावेळी महापालिकेच्या सर्वसाधारण सभेत गदारोळ निर्माण झाल्याने महापौर मंगेश पवार यांनी सभागृह काहीवेळासाठी तहकूब केले होते. ही माहिती समजताच कन्नड संघटनांनी महापालिकेत घुसण्याचा प्रयत्न करत थयथयाट केला होता. तसेच रवी साळुंखे व इतरांचे सदस्यत्व रद्द करण्यात यावे, अशी मागणी जिल्हाधिकाऱ्यांकडे केली होती.
आपणाला कोणतीच माहिती नाही!
मंगळवारी सदर पत्र मनपा आयुक्त व महापौरांना दिल्यानंतरच त्यात नेमके काय म्हटले आहे, हे समजणार आहे. पण म. ए. समितीचे नगरसेवक रवी साळुंखे व त्यांच्या सहकाऱ्यांचे सदस्यत्व रद्द करण्यासाठी जोरदार प्रयत्न सुरू असल्याची चर्चा आहे. याबाबत अधिक माहिती जाणून घेण्यासाठी अप्पर जिल्हाधिकारी विजयकुमार होनकेरी यांच्याशी संपर्क साधून विचारणा केली असता त्यांनी याबाबत आपणाला कोणतीच माहिती नसल्याचे सांगितले.
आज बैठकीचे आयोजन?
अप्पर जिल्हाधिकारी विजयकुमार होनकेरी यांनी रवी साळुंखे व इतरांचे सदस्यत्व रद्द करण्यासंदर्भात चौकशी करून अहवाल द्यावा, अशा आशयाचे पत्र मनपाला दिल्याची खात्रीलायक माहिती उपलब्ध झाली आहे. सदर पत्र टपाल विभागाला मिळाले असून कौन्सिल विभागाकडून सदर माहिती महापौर मंगेश पवार यांना दिल्याचेही समजते. याबाबत चर्चा करण्यासाठी महापौर मंगेश पवार यांनी मंगळवारी बैठकीचे आयोजन करू, असे कौन्सिल विभागाला सांगितल्याची माहिती उपलब्ध झाली आहे. अप्पर जिल्हाधिकाऱ्यांनी पाठविलेल्या या पत्रातील अधिक तपशील कौन्सिल विभागालाही उपलब्ध होऊ शकला नाही.









