बेळगाव : लोकसभेच्या 2024 मधील निवडणुकीत आचारसंहिता भंग केल्याचा ठपका ठेवत म. ए. समितीच्या नेत्यांसह कार्यकर्त्यांविरोधात कॅम्प पोलिसांनी गुन्हा दाखल केला होता. या खटल्याची सोमवार दि. 29 रोजी पाचवे अतिरिक्त दिवाणी न्यायालयात सुनावणी झाली. यावेळी समिती नेते व कार्यकर्त्यांना सशर्त जामीन मंजूर करण्यात आला. म. ए. समितीचे लोकसभेचे उमेदवार महादेव पाटील, माजी आमदार मनोहर किणेकर, खजिनदार प्रकाश मरगाळे, युवानेते शुभम शेळके, माजी उपमहापौर रेणू किल्लेकर, माजी महापौर सरिता पाटील अशी जामीन मंजूर झालेल्यांची नावे आहेत.
2024 मध्ये लोकसभा निवडणुकीत म. ए. समितीतर्फे लोकसभेचे उमेदवार म्हणून महादेव पाटील रिंगणात उतरले होते. त्यांचा उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी धर्मवीर संभाजी चौकातून जिल्हाधिकारी कार्यालयाकडे जात असताना बेळगाव, कारवार, निपाणी, बिदर, भालकीसह संयुक्त महाराष्ट्र झालाच पाहिजे, अशा घोषणा देणे, त्याचबरोबर बैलगाडीतून विनापरवाना फेरी काढण्यात आल्याचा ठपका ठेवत कॅम्प पोलिसांनी वरील समिती नेते व कार्यकर्त्यांवर गुन्हा दाखल केला होता. तपास करून लोकप्रतिनिधी कायदा कलम 125, 127, भारतीय दंड संहिता कलम 505 नुसार न्यायालयात दोषारोप दाखल केला.
त्यामुळे या खटल्याची सुनावणी सुरू आहे. वरील सर्वांना जामीन मिळावा यासाठी न्यायालयात अर्ज करण्यात आला होता. सोमवारी झालेल्या सुनावणीवेळी न्यायालयाने सर्वांना 20 हजार रुपयांच्या जातमुचलक्यावर व तितक्याच रकमेचा जामीन, तसेच पुन्हा अशा प्रकारचा गुन्हा करू नये, अशा अटींवर जामीन मंजूर केला आहे. यावेळी न्यायालयात माजी महापौर मालोजी अष्टेकर, धनंजय पाटील, मनोहर हुंदरे, प्रकाश गडकरी उपस्थित होते. समिती नेते व कार्यकर्त्यांच्यावतीने अॅड. महेश बिर्जे, अॅड. बाळासाहेब कागणकर, अॅड. रिचमॅन रिकी, अॅड. वैभव कुट्रे काम पहात आहेत.









