बेळगाव : तालुक्यातील विविध गावांतून भारतीय सैन्य दलात भरती झालेल्या युवक आणि युवतींचा तालुका महाराष्ट्र एकीकरण समिती युवा आघाडीतर्फे गोवावेस येथील मराठा मंदिरात बुधवार दि. 15 रोजी सत्कार करण्यात आला. यावेळी शाल, श्रीफळ व मानचिन्ह देऊन भावी सैनिकांचे कौतुक करण्यात आले. तालुका म. ए. समिती युवा आघाडीच्यावतीने बुधवारी मराठा मंदिरमध्ये लष्करात भरती झालेल्या युवक-युवतींच्या सत्कार कार्यक्रमाचे आयोजन केले होते. अध्यक्षस्थानी तालुका म. ए. समितीचे अध्यक्ष माजी आमदार मनोहर किणेकर होते. यावेळी शंकर कोनेरी यांनी प्रास्ताविक केले. प्रथम मान्यवरांच्या हस्ते दीपप्रज्वलन करण्यात आले. त्यानंतर माजी आमदार मनोहर किणेकर म्हणाले, देशाच्या सीमांचे रक्षण करण्यासाठी भारतीय सैन्य तत्पर असल्याने आज देश सुरक्षित आहे. सैन्य आहे म्हणूनच आम्ही आज घरी निवांत राहू शकतो.
सीमेचे रक्षण करण्याची जबाबदारी भारतीय लष्कर निभावत आहे. तालुक्यातील युवक-युवतींनी लष्करासाठी आपले जीवन समर्पित केले आहे. त्यांच्या या धैर्यासाठी आई-वडिलांनी दिलेले योगदानही तितकेच महत्त्वाचे आहे. सीमाभागातील तरुणांना कन्नड सक्तीमुळे राज्य सरकारच्या नोकरभरतीत संधी मिळत नाही. त्यामुळे केंद्र सरकारच्या अखत्यारित येणाऱ्या भारतीय सैन्य दलात मराठी तरुण आपले नशीब आजमावत आहेत. एखादा मुलगा यशस्वी व्हायचा असल्यास त्याच्यावर चांगले संस्कार होणे जरुरीचे आहे. देशसेवेसाठी प्रेरित होऊन तरुणांनी घेतलेला हा निर्णय धाडसी आहे, असे ते म्हणाले. त्यानंतर उपस्थित 30 हून अधिक तरुण-तरुणींचा मान्यवरांच्या हस्ते शाल, श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला. यावेळी तालुका म. ए. समिती युवा आघाडीचे अध्यक्ष राजू किणेकर, ता. पं. माजी सदस्या कमल मन्नोळकर यांच्यासह पदाधिकारी उपस्थित होते.









