निवेदन देण्यासाठी लावली हजेरी
बेळगाव : बेळगाव महानगरपालिकेमध्ये मराठीच्या मुद्द्यावर नेहमीच आवाज उठविणाऱ्या म. ए. समितीच्या नगरसेवकांनी सोमवारी निवेदन देण्यासाठी उपस्थिती लावली होती. केवळ उपस्थिती न लावता ‘आम्हाला भीक नको, भाषिक अधिकार द्या’ असे प्रशासनाला ठणकावून सांगितले. त्यामुळे या नगरसेवकांच्या कृतीमुळे मराठी भाषिकांतून समाधान व्यक्त होत आहे.
महानगरपालिकेतील सर्वसाधारण सभेची नोटीस, तसेच इतिवृत्त मराठीतून मिळावे, यासाठी म. ए. समितीचे नगरसेवक रवी साळुंखे, शिवाजी मंडोळकर व वैशाली भातकांडे यांनी वेळोवेळी आंदोलन केले आहे. मागील महिन्यात झालेल्या बैठकीवेळी म. ए. समितीचा आवाज बुलंद करत हे तिन्ही नगरसेवक अधिकारी, तसेच सत्ताधाऱ्यांवर तुटून पडले होते. ज्या-ज्यावेळी मराठी भाषेवर गदा येते, त्या-त्यावेळी त्यांनी आपले मराठीपण सिद्ध करून दाखविले आहे.
ज्यावेळी कन्नड भाषेचा प्रश्न येतो, त्यावेळी पक्षभेद विसरून सर्व कानडी भाषिक नगरसेवक एकत्र होतात. परंतु, मराठी भाषिक नगरसेवक भाषेसाठी सोयीस्कररीत्या पाठ फिरवत असल्याचे सोमवारी पुन्हा एकदा दिसून आले. महानगरपालिकेमध्ये सर्वाधिक नगरसेवक हे मराठी भाषिक आहेत. परंतु, पक्षीय राजकारणामध्ये अडकलेल्या या नगरसेवकांनी जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देण्यासाठी येणे टाळले. त्यामुळे उपस्थित मराठी भाषिकांनी संताप व्यक्त केला.









