एमबीए विद्यार्थ्यांना पाच लाखांच्या शिष्यवृत्तीचे वितरण
बेळगाव : केएलएस इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट एज्युकेशन अँड रिसर्च (आयएमईआर) च्यावतीने एमबीए विद्यार्थ्यांना 5 लाख रुपयांच्या शिष्यवृत्त्यांचे वितरण करण्यात आले. उल्लेखनीय कामगिरी केलेल्या विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती देण्यात आली. कर्नाटक एक्झामिनेशन अॅथॉरिटीकडून घेण्यात आलेल्या पीजी-सीईटी 2024 मध्ये पहिल्या एक हजार विद्यार्थ्यांमध्ये ज्या विद्यार्थ्यांनी क्रमांक मिळविले, त्यांना प्रत्येकी 50 हजार रुपये शिष्यवृत्ती देण्यात आली. सिद्धार्थ बेळवी याने 124 वा रँक घेतला. नेहा कदम हिने 474 रँक तर अमृता काजवे हिने 761 वा रँक मिळविला. त्याचबरोबर कर्नाटका मॅनेजमेंट अॅप्टिट्यूड टेस्ट (के-एमएटी) 2024 परीक्षेमध्ये 170 हून अधिक मॅनेजमेंट इन्स्टिट्यूटनी सहभाग घेतला होता. यामध्ये पहिल्या पाचमध्ये आलेल्या आयएमईआरच्या विद्यार्थ्यांना प्रत्येकी 30 हजार रुपये शिष्यवृत्ती देण्यात आली. प्रगती कोलवेकर, दिव्याश्री पायन्नावर, सानिका केरकर यांना शिष्यवृत्ती देण्यात आली.
आयएमईआर मेरिट स्कॉलरशीप
पदवी अभ्यासक्रमाला 85 टक्क्यांहून अधिक गुण घेतलेल्या आयएमईआरच्या पहिल्या दहा विद्यार्थ्यांना प्रत्येकी 20 हजार रुपये शिष्यवृत्ती देण्यात आली. यामध्ये करुणा जोशी, सृष्टी कोरटी, नंदिनी चौगुला, पार्वती मुरगोड, वैष्णवी जगताप, स्मिता पाटील, योगिता कोंडे, सी. एच. मेघा, पूजा शिंदे व साक्षी काकडे यांना शिष्यवृत्ती देण्यात आली. विद्यार्थ्यांना त्यांचे पुढील शिक्षण घेणे सोयीचे व्हावे, या उद्देशाने शिष्यवृत्तीचे वाटप करण्यात आले. या शिष्यवृत्तीचे वितरण समागम-2025 कार्यक्रमादरम्यान करण्यात आले. या कार्यक्रमाला कॉलेजच्या गव्हर्निंग कौन्सिलचे चेअरमन आर. एस. मुतालिक व संचालक डॉ. अरिफ शेख उपस्थित होते.









