राजीव कला मंदिर येथे आषाढी एकादशीनिमित्त विठ्ठल नामाचा गजर
प्रतिनिधी /फोंडा
मंदिरात भगवंताच्या चरणी आपल्याबरोबर दुर्बलांचेही भले व्हावे, समाजातील प्रत्येक घटकाचा आदर करण्यात जो धन्यता मानतो तोच खरा भगवंताचा सेवक आहे. आपल्या आईवडीलाची सेवा हीच देवाला वाहलेली भक्ती आहे. श्री हरी विठ्ठल दार ठोठावत असताना संत पुंडलीकाने आपल्या पालकांप्रती तल्लीन होऊन केलेली निस्वार्थ सेवा हीच खरी देवभक्ती असल्याचे प्रतिपादन कला आणि संस्कृती मंत्री गोविंद गावडे यांनी केले.
आषाढी एकादशीच्या निमित्ताने काल रविवारी फोंडा येथील राजीव कला मंदिरतर्फे आयोजित ‘विठ्ठल नामाचा गजर’ या अभंग भक्तीगीतांच्या कार्यक्रमात ते प्रमुख पाहूणे म्हणून बोलत होते. यावेळी त्याच्यासमवेत कला मंदिरचे सदस्य सचिव गिरीष सावंत, संचालक किरण नाईक उपस्थित होते. पंढरपूरच्या थिमसह आकर्षक सजावटीत राजीव कला मंदिरच्या मा. दत्ताराम सभागृहात उभारण्यात आलेल्या विठेवरी उभा विठ्ठलाच्या रूपाने सर्व भाविकांच्या डोळयाचे पारडे फिटले. यावेळी पुढे बोलताना मंत्री गोविंद गावडे म्हणाले की कला मंदिरतर्फे गुरूशिष्य नाते दृढ करणारा अभंग भक्तीगीताचा कार्यक्रम हा सुप्त उपक्रम आहे. अशा कार्यक्रमातून संस्कारांची देवाणघेवाण होत असून युवकांमध्ये आदरभावना निर्माण होत असते. अभंग भक्तीगीताच्या माध्यमातून सर्व भक्ताना पंढरपूरच्या विठ्ठलाचे दर्शन होईल असे सांगून आषाढी एकादशीच्या शुभेच्छा दिल्या.
कार्यक्रमाची सुरूवात मान्यवरांच्याहस्ते दिप प्रज्ज्वलन झाली. त्यानंतर कला मंदिरच्या संगीत विभागाचे शिक्षक व विद्यार्थ्यांचे बहरदार संगीताच्या मैफिली झाल्या. यात शिक्षक गायकमध्ये सिद्धी सुर्लकर पिळगांवकर, दामोदर च्यारी, सुभाष परवार, योगानंद गावडे यांना सतारवादन सदानंद आमोणकर, पखवाजावर श्रीकृष्ण सतरकर, तबल्यावर परेश नाईक, ऑर्गनवर सुभाष फातर्पेकर, टाळ वादक राहूल खांडोळकर दयेश गावडे, विशाल मडकईकर यांनी साथसंगत केली. तसेच विद्यार्थ्याच्या गटातील ऋषिकेश साने, शौनक च्यारी, शेया नाईक, मयांक नाईक, शरद गावडे यांनी गायन सादर केले. शिवरंजनी रागाने मैफिलीला प्रारंभ करण्यात आला. त्यानंतर गुरूशिष्याच्या एकाहून एक सरस अभंग गायन झाले. कार्यक्रमाचे सुत्रसंचालन संचालक गिरीष वेळगेकर यांनी केले.









