आरोग्यासाठी मंद विष
जगातील नद्यांमध्ये आता केवळ पाणीच नव्हे तर अत्यंत धोकादायक घटकही वाहत आहे. नद्यांद्वारे समुद्रात पोहोचणारा हा पारा आता औद्योगिक युगापूर्वीच्या तुलनेत दुपटीपेक्षा अधिक झाला आहे. तुलाने विद्यापीठ आणि आंतरराष्ट्रीय वैज्ञानिकांच्या संयुक्त संशोधनात याचा खुलासा झाला आहे. पारा केवळ जलीय जीवन नव्हे तर मानवी आरोग्य, अन्नसाखळी आणि जैवविविधतेसाठी वाढणारा धोका आहे.
संशोधकांनी मोसार्ट-एचजी नावाच्या एका कॉम्प्युटर मॉडेलच्या सहाय्याने हे अध्ययन केले. मॉडेलने नद्यांच्या माध्यमातून समुद्रात पोहोचणाऱ्या पाऱ्याच्या प्रमाणाचे विश्लेषण केले, जे औद्योगिक युगापूर्वीच्या तुलनेत सध्या खूपच अधिक आहे. मॉडेलद्वारे प्राप्त निष्कर्ष जगभरातील किनारी क्षेत्रांमधून मिळालेल्या नमुन्यांशी मिळतेजुळते आहेत. 1850 पूर्वी नद्या दरवर्षी सरासरी 390 मेट्रिक टन पारा समुद्रापर्यंत पोहोचवित होत्या, आता हे प्रमाण 1000 मेट्रिक टनाच्या नजीक पोहोचले आहे.
पक्षी अन् वन्यजीवांसाठी घातक
नद्यांमध्ये वाढता पारा वन्यजीव आणि पक्ष्यांसाठी एक अदृश्य धोका आहे. हा विषारी धातू सुक्ष्मजीवांमधून मासे अन् अन्य जलीय जीवांमध्ये जमा होतो, पक्षी आणि वन्यप्राणी या जीवांना खातात, तेव्हा पारा त्यांच्या शरीरात पोहोचून हानी पोहोचवितो. यामुळे त्यांची प्रजननक्षमता प्रभावित होते.
मानवी आरोग्यासाठी धोकादायक
पारा मानवासाठी धोकादायक आहे. यामुळे स्मरणशक्ती, एकाग्रता, भाषा अन् मोटर स्किल्सवर प्रतिकूल प्रभाव पडतो. गरोदर महिलांसाठी हे आणखी धोकादायक आहे, कारण हे भ्रूणाच्या विकासाला प्रभावित करू शकते. किडनी आणि हृदयसंबंधी रोगांचा धोकाही पाऱ्यामुळे वाढतो.
अमेरिकेत सर्वाधिक पाऱ्याचे प्रदूषण
1850 नंतर पाऱ्याचे प्रदूषण उत्तर आणि दक्षिण अमेरिकेत सर्वात वेगाने वाढले आहे. जगात एकूण वाढीच्या 41 टक्के येथूनच आले आहे. यानंतर दक्षिणपूर्व आशिया 22 टक्के तर दक्षिण आशियात 19 टक्के प्रमाण राहिले. अमेझॉन नदी आता दरवर्षी 200 मेट्रिक टनाहून अधिक पारा वाहून येत आहे, ज्यातील 75 टक्के मानवी हालचालींमुळे येतेय. जंगलतोड आणि सोन्याच्या खाणी याचे मोठे कारण आहे. चीनच्या यांग्त्जी नदीत औद्योगिक हालचालींमुळे पाऱ्याचा स्तर दुप्पटीहून अधिक झाला आहे.









