पाच-दहा हजार रुपयाच्या आमिषापोटी तरुणाईचा हकनाक बळी : प्रमुख सूत्रधार मात्र नामानिराळेच, सावधगिरी बाळगणे नितांत गरजेचे
बेळगाव : सायबर गुन्हेगारी थोपवण्यासाठी सायबर क्राईम विभागाकडून सातत्याने प्रयत्न सुरू आहेत. पोलिसांच्या एक पाऊल पुढे जाऊन गुन्हेगार सावजांना ठकवत आहेत. या परिस्थितीत बदल करण्यासाठी सायबर क्राईम विभागाबरोबरच नागरी पोलिसांनाही प्रशिक्षण दिले जात आहे. पोलीस दलाकडून व्यापक प्रयत्न होऊनही सावज मात्र सावध होत नाहीत, अशी स्थिती आहे. आता भाडोत्री बँक खात्यांची डोकेदुखी वाढली आहे. घर, दुकान भाड्याने घेतल्याप्रमाणेच बँक खातीही भाड्याने घेण्याचे प्रकार सुरू झाले आहेत. हा प्रकार सायबर क्राईम विभागासाठीच नव्हे तर सर्वसामान्य नागरिकांसाठीही धोकादायक ठरतो आहे. सायबर क्राईम विभाग व पोलीस यंत्रणेचा ससेमिरा चुकविण्यासाठी गुन्हेगार स्थानिक तरुणांचा वापर करीत आहेत. त्यांना पैशांचे आमिष दाखवून स्थानिक तरुणांचे बँक खाते गुन्हेगारीसाठी वापरण्यात येत आहे.
महिन्याभरापूर्वी चेन्नई येथील सायबर क्राईम विभागाच्या अधिकाऱ्यांनी बेळगावच्या तीन तरुणांना अटक केली होती. त्याआधी मंगळूर जिल्हा सायबर क्राईम विभागानेही शहापूर, वडगाव परिसरातील तीन तरुणांना अटक केली होती. आता दोन दिवसांपूर्वी शहापूर येथील आणखी एका तरुणाला उत्तरप्रदेशमधून सायबर क्राईम विभागाची नोटीस आली आहे. नोटीस पोहोचल्यानंतर केवळ दहा दिवसात लखनौ येथे चौकशीसाठी हजर राहण्याची सूचना नोटिसीत करण्यात आली आहे. आपण काही गुन्हाच केला नाही तर सायबर क्राईम विभागाची नोटीस आपल्याला कशी? या विचारात तो तरुण कायद्याची मदत मागतो आहे. शहापूर येथील एका तरुणाच्या बँक खात्यावर 1 कोटी रुपयांचा व्यवहार झाला आहे. हा व्यवहार कोणी केला? याची पुसटशी माहितीही त्याला नाही. काही महिन्यांपूर्वी त्याच्या एका मित्राने शहापूरच्या तरुणाकडे आधारकार्ड व इतर कागदपत्रे मागितली होती.
आपल्याला बँक खाते उघडायचे आहे. आपल्याकडे त्यासाठी लागणारी कागदपत्रे पूर्ण प्रमाणात नाहीत. त्यामुळे तुझी कागदपत्रे दे, तुझ्या नावाने खाते उघडतो, असे सांगत मित्राने कागदपत्रे घेतली होती. लखनौमधून नोटीस आल्यानंतरच आपल्या कागदपत्रांचा दुरुपयोग कसा झाला आहे? हे शहापूरच्या तरुणाला लक्षात आले. बेळगावातील अनेक तरुणांनी झटपट पैशांच्या मोहापायी आपली बँक खाती वापरण्यासाठी सायबर गुन्हेगारांना दिली आहेत. त्या खात्यांवर व्यवहार होऊन पोलिसात एफआयआर दाखल झाल्यानंतरच आपण फसलो गेलो, याची संबंधितांना कल्पना येणार आहे. डिजिटल अरेस्टचा प्रकार असो किंवा केवायसी बदलण्याचे सांगून ओटीपीच्या माध्यमातून सावजाला ठकवण्याचा प्रकार असो, अशा फसवणूक प्रकरणातील रक्कम भाडोत्री बँक खात्यात वळवली जाते. सायबर क्राईम अधिकारी सहजपणे खातेधारकांपर्यंत पोहोचू शकतात. मात्र, तेथून पुढे कोण आहे? याचा उलगडा होत नाही.
कोणत्याही परिस्थितीत अशा प्रकरणात आपण सापडू नये, याची खबरदारी गुन्हेगार घेत आहेत. केवळ तीन महिन्यात बेळगाव येथील सातहून अधिक तरुणांना चेन्नई, मंगळूर पोलिसांकडून अटक झाली आहे. केवळ कर्नाटकच नव्हे तर गुजरात, उत्तरप्रदेश, मुंबईमध्येही अशी अनेक प्रकरणे घडली आहेत. गुन्हेगार टेलिग्राम, फेसबुक व इतर समाजमाध्यमांच्या माध्यमातून मध्यमवर्गीय तरुणांना गाठतात व त्यांच्या नावे बँकेत खाते उघडून त्या खात्यांवर व्यवहार सुरू करतात.
बँक खाते उघडण्यासाठी सर्व कागदपत्रे, एटीएम कार्ड, चेकबुकसाठी एक रक्कम ठरवली जाते. ज्याच्या नावे बँक खाते आहे, त्याला एकूण व्यवहारावर 1 ते 5 टक्के कमिशन देण्याचे आमिष दाखवलेले असते. अलीकडे केंद्र सरकारने ऑनलाईन बेटिंग व गेमिंग अॅपवर बंदी घातल्यानंतरही बँक खाती भाड्याने घेण्याचे प्रकार वाढले आहेत. गैरव्यवहारांसाठी अशा बँक खात्यांचा वापर केला जात असून, सायबर क्राईम विभागाचे अधिकारी दरवाजा ठोठावल्यानंतरच आपण गुन्हेगारी प्रकरणात अडकलो गेलो, याची तरुणांना कल्पना येत आहे.
खासकरून चीन, थायलंड, कम्बोडिया, युएई आदी देशात बसून ही यंत्रणा राबविणारे सायबर गुन्हेगार तरुणाईला आमिष दाखवून त्यांच्या बँक खात्यांवर व्यवहार करीत आहेत. विद्यार्थी व आर्थिक संकटातील तरुणच सायबर गुन्हेगारांच्या गळाला लागत आहेत. बेळगाव, बागलकोट व विजापूर येथील सायबर क्राईम विभागाचे अधिकारी यापूर्वी अनेक वेळा गुन्हेगारी प्रकरणांच्या तपासासाठी नोयडा व नवी दिल्लीला गेले होते. ज्यांच्या नावे बँक खाते आहे, ती व्यक्ती एकतर दिव्यांग असते किंवा वृद्ध असतो. त्यांना 5 ते 10 हजार रुपयांचे आमिष देऊन त्यांच्या नावे बँक खाते उघडल्याचे अनेक वेळा पोलीस तपासात स्पष्ट झाले आहे.
अनेक वेळा तर सायबर गुन्हेगार मृत व्यक्तींच्या नावावरील बँक खात्यावर व्यवहार केल्याची उदाहरणे आहेत. शहापूर, वडगाव बरोबरच मारिहाळ परिसरातील अनेक गावातील तरुण सायबर गुन्हेगारांच्या गळाला अडकून आपली बँक खाती त्यांना भाड्याने दिली आहेत. गुन्हेगारी प्रकरणात अडकल्यानंतरच त्यांना आपण या प्रकरणात कशापद्धतीने अडकलो आहोत, याची जाणीव होणार आहे. कोणालाही आपली बँक खाती देताना विचार केला नाही तर मोठा फटका हा बसणार, हे निश्चित असून सायबर गुन्हेगारांवर जी कारवाई होते त्या कारवाईला रेंट अकौंट होल्डरनाही सामोरे जावे लागणार आहे.
आपले बँक खाते कोणालाही देऊ नका
यासंबंधी पोलीस आयुक्त भूषण गुलाबराव बोरसे यांनी तर गेल्या काही महिन्यांपासून सायबर क्राईम थोपवण्यासाठी प्रयत्न सुरू केले आहेत. सायबर क्राईम विभागात काम केल्याचा अनुभव त्यांच्या पाठीशी आहे. रेंट अकौंटच्या माध्यमातून सुरू असलेल्या फसवणूक प्रकरणे टाळायची असतील तर आपले बँक खाते वापरण्यासाठी कोणालाही देऊ नये, आधारकार्ड किंवा इतर माहितीही दुसऱ्यांना देऊ नये, असे त्यांनी सांगितले आहे. खासकरून कामगारवर्गाची फसवणूक होऊ शकते. त्यांचे बँक खाते, ओळखपत्रे एखाद्या ठेकेदाराकडे असतात. तेथूनही त्याचा दुरुपयोग होऊ शकतो. गुन्हेगार यासाठी वेगवेगळी शक्कल लढवतात. आपली फसवणूक होऊ नये म्हणून आपणच सावध राहण्याची गरज आहे. सोशल मीडियाच्या कोणत्याही प्लॅटफॉर्मवर आपली वैयक्तिक माहिती, बँक खात्यासंबंधीची माहिती, ओळखपत्रे, मतदार ओळखपत्रे आदी शेअर करू नये. गुन्हेगार गरीब व मध्यमवर्गीयांनाच आपले लक्ष्य बनवतात. एकदा अशा गुन्ह्यात अडकले की, संपूर्ण गुन्ह्याची जबाबदारी बँक खातेधारकांवरही येते. त्यांच्यावरही कारवाई होते. त्यामुळे प्रत्येकाने खबरदारी बाळगावी, असे आवाहन पोलीस आयुक्तांनी केले आहे.
-पोलीस आयुक्त भूषण गुलाबराव बोरसे










