वृत्तसंस्था/ सिंगापूर
मर्सिडीजच्या जॉर्ज रसेलने येथे झालेल्या सिंगापूर ग्रां प्रि फॉर्म्युला वन शर्यतीचे जेतेपद पटकावले तर मॅक्लारेनने फॉर्म्युला वन कन्स्ट्रक्टर्स चॅम्पियनशिप सहा शर्यती बाकी असतानाच मिळविली. येथील शर्यतीत रेड बुलच्या मॅक्स व्हर्स्टापेनने दुसरे व मॅक्लारेनच्या लँडो नोरिसने तिसरे स्थान पटकावले.
रसेलने पोल पोझिशनवरून सुरुवात केली आणि अखेरपर्यंत आघाडी कायम राखत जेतेपद मिळविले. मर्सिडीजने जिंकलेली या मोसमातील ही दुसरी शर्यत आहे. व्हर्स्टापेनने कारची समस्या असली तरी नोरिसला मागे ठेवत दुसरे स्थान मिळविले. रसेलसाठी ही शर्यत वैयक्तिक माईलस्टोन ठरली. कारण 2023 मध्ये त्याची कार शेवटच्या लॅपवेळी क्रॅश झाली होती. मॅक्लारेनच्या ऑस्कर पियास्ट्रीने चौथे, मर्सिडीजच्या एके अँटोनेलीने पाचवे, फेरारीच्या लेक्लर्कने सहावे, अॅस्टन मार्टिनच्या फर्नांडो अलोन्सोने सातवे, फेरारीच्याच लेविस हॅमिल्टनने आठवे, हासच्या ओ. बीयरमनने नववे व विल्यम्सनच्या कार्लोस सेन्झ ज्युनियरने दहावे स्थान मिळवित शेवटचा गुण मिळविला.
ड्रायव्हर्स स्टँडिंगमध्ये मॅक्लारेनचा ऑस्कर पियास्ट्री 336 गुणांसह पहिल्या, मॅक्लारेनचा नोरिस 314 गुणांसह दुसऱ्या, 273 गुणांसह रेड बुलचा व्हर्स्टापेन तिसऱ्या, 237 गुणांसह मर्सिडीजचा रसेल चौथ्या, 173 गुणांसह फेरारीचा लेक्लर्क पाचव्या स्थानावर आहे. फेरारीच्या हॅमिल्टनच्या नावावर 125 गुण जमा झाले असून तो सहाव्या स्थानावर आहे.









