केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीत निर्णय, इतरही महत्वाचे ठराव
► वृत्तसंस्था / नवी दिल्ली
देशातील युवा शक्तीला सकारात्मक आणि संघटनात्मक सामर्थ्य देण्यासाठी ‘मेरा युवा भारत’ किंवा माय भारत ही संघटना स्थापन करण्याचा निर्णय केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेण्यात आला आहे. भारतात वय वर्षे 15 ते 19 दरम्यानचे 40 कोटी युवक आहेत. त्यांच्यासाठी ही संघटना कार्य करणार आहे.
बुधवारी केंद्रीय मंत्रिमंडळाची बैठक पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वात झाली. या बैठकीत इतरही अनेक महत्वपूर्ण निर्णय घेण्यात आले. भारतात सापडलेल्या मोठ्या लिथियम साठ्यातून लिथियम या धातूचे उत्पादन करण्यासाठी रॉयल्टी निर्धारित करण्यात आली आहे. तसेच फ्रान्सशी झालेल्या डिजिटल तंत्रज्ञान क्षेत्रातील सहकार्य करारालाही या बैठकीत संमती देण्यात आली आहे.
मेरा युवा भारत कशासाठी…
15 ते 19 या वयोगटातील कोट्यावधी युवक भारतात आहेत. कोणत्याही इतर देशाशी तुलना करता ही सर्वाधिक मोठी युवाशक्ती भारतात आहे. या शक्तीचा उपयोग विधायक कार्यासाठी होणे आवश्यक आहे. यासाठी मेरा युवा भारत ही संघटना स्थापन करण्यात येणार आहे. या संघटनेशी जोडून घेऊन अनेक देशहिताची कामे करु शकणार आहेत. शिक्षण, आरोग्य, स्वच्छता आदी क्षेत्रांमध्ये कामे करण्याची ज्या युवकांची इच्छा आहे, ते या संघटनेच्या माध्यमातून ही कामे करुन देशाची सेवा करु शकतात, अशी माहिती देण्यात आली आहे.
प्रथम प्रयत्नात लक्ष्य पार
देशात सध्या प्लॅस्टिकच्या कचऱ्याचा प्रश्न गंभीर बनला आहे. तो सोडविण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशातील युवकांना प्लॅस्टिक कचरा संकलित करण्याचे आवाहन केले होते. 75 लाख टन कचऱ्याचे लक्ष्य ठेवण्यात आले होते. तथापि आपल्या युवकांनी हे अभियान गांभीर्याने घेतले आणि अत्यल्प वेळेत एक कोटी टन प्लॅस्टिक कचरा संकलित केला. यातून ही नवी संघटना स्थापन करण्याची कल्पना मिळाली आहे. या संघटनेशी जोडून घेण्यासाठी एक डिजिटल प्लॅटफॉर्म लवकरच क्रियान्वित करण्यात येत आहे.
डिजिटल कराराला संमती
भारताने फ्रान्सशी अत्यंत महत्वपूर्ण असा डिजिटल तंत्रज्ञान सहकार्य करार केला आहे. या कराराला केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीत संमती देण्यात आली आहे. या करारामुळे भारताला अत्याधुनिक डिजिटल तंत्रज्ञान, कृत्रिम बुद्धिमत्ता तंत्रज्ञान आदी क्षेत्रांमध्ये फ्रान्सचे मोलाचे सहकार्य मिळणार आहे. तंत्रज्ञान हस्तांतरण करण्याची तरतूदही या करारात आहे, असे प्रतिपादन करण्यात आले आहे.
लिथियमसाठी रॉयल्टी
काही महिन्यांपूर्वी भारतात लिथियम या मौल्यवान धातूचे मोठे साठे सापडले होते. या धातूचा उपयोग अत्याधुनिक इलेक्ट्रॉनिक साधने निर्माण करण्यासाठी होतो. भारतात सापडलेल्या या धातूच्या साठ्यातून धातूचे उत्पादन करण्याची केंद्र सरकारची योजना असून खासगी क्षेत्राचा सहभाग आमंत्रित करण्यात येणार आहे. त्यासंबंधी या धातूच्या उत्खननाची आणि उत्पादनाची रॉयल्टी निर्धारित करण्यात आली आहे. ती लिथियमसाठी 3 टक्के तर निओबियम या धातूसाठी 1 टक्का अशी निर्धारित करण्यात आली आहे. या मौल्यवान धातूंच्या खाणींचा लिलाव करताना हा रॉयल्टी दर अत्यंत महत्वाचा ठरणार आहे, असे स्पष्ट करण्यात आले.
ड युवाशक्तीला विधायक वळण लावण्यासाठी संघटना स्थापन केली जाणार
ड लिथियम धातूच्या उत्खननासाठी रॉयल्टीचे प्रमाण 3 टक्के इतके असणार
ड फ्रान्सशी करार केल्याचा जास्तीत जास्त लाभ उठविण्याचा प्रयत्न होणार









