पुणे / वार्ताहर :
पुण्याच्या कर्वे रस्त्यावरील नळस्टॉप चौकात एका ड्रग्ज तस्कराला पोलिसांनी सापळा रचून अटक केली. त्याच्याकडून 55 ग्रॅम मेफेड्रॉन जप्त करण्यात आले आहे. त्याची आंतरराष्ट्रीय बाजारात 11 लाख रुपये किंमत आहे.
संकल्प सुरेश सकपाळ (वय 33, रा. वरळी, मुंबई) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. आरोपी विरोधात डेक्कन पोलीस ठाण्यात एनडीपीएस ऍक्ट कलम 8 (क) व 22 (क) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
अमली पदार्थ विरोधी पथक दोनचे पोलीस डेक्कन परिसरात पेट्रोलिंग करत होते. त्यावेळी पोलीस अंमलदार संदीप शेळके व योगेश मांढरे यांना एक व्यक्ती नळस्टॉप चौकात मेफेड्रॉन विक्रीसाठी येणार असल्याची माहिती मिळाली. त्यानुसार पोलिसांनी सापळा रचून संशयित व्यक्तीस ताब्यात घेऊन त्याची झडती घेतली. त्यावेळी त्याच्याकडे 11 लाख रुपयांचे 55 ग्रॅम मेफेड्रॉन आढळून आले. त्यानंतर पोलिसांनी त्याला अटक केली.








