पुणे / वार्ताहर :
पुण्याच्या बंडगार्डन आणि खडकी परिसरात मेफेड्रॉन विक्री करण्यासाठी आलेल्या दोघांना गुन्हे शाखेच्या अमली पदार्थ विरोधी पथकाने अटक केली. त्यांच्याकडून साडेनऊ लाख रुपयांचे मेफेड्रॉन जप्त करण्यात आले आहे.
आरटीओ कार्यालयाजवळ एक व्यक्ती मेफेड्रॉन विक्री करण्यासाठी येणार आसल्याची माहिती पोलीस अंमलदार योगेश मोहिते व विशाल शिंदे यांना मिळाली होती. त्यानुसार पोलीस पथकाने समीउल्ला सलीम शेख (वय 27, रा. बोपोडी, पुणे) या संशयिताला ताब्यात घेतले. त्याच्याकडून पावणेतीन लाखांचे मेफेड्रॉन आणि मोटार असा ऐवज जप्त केला.
तर दुसऱया घटनेत खडकीतील बोपोडीत मिलींदनगर येथे जितू सुंदर नायडू हा व्यक्ती मेफेड्रोन विक्रीच्या तयारीत असताना त्याला अटक केली. त्याच्याकडून मेफेड्रॉनसह 6 लाख 70 हजारांचा ऐवज जप्त केला आहे. हे दोन्ही आरोपी एकमेकांच्या संपर्कात असून ते मुंबईतून मेफेड्रॉन आणून त्याची पुण्यात विक्री करीत होते. पुणे पोलीस अधिक तपास करत आहेत.








