अभ्यासक्रमाचे भगवेकरण नाही : एनसीईआरटी प्रमुख
वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
एनसीईआरटीच्या पुस्तकातून बाबरीशी निगडित उल्लेख वगळण्यात आला आहे. पाठ्यापुस्तकांमधील बदलावर आता एनसीईआरटी प्रमुखांनी भूमिका मांडली आहे. शाळांमध्ये इतिहास हा तथ्यांबद्दल कळावे म्हणून शिकविला जातो. शाळांना युद्धभूमी करण्यासाठी इतिहास शिकविला जात नाही. अभ्यासक्रमात सुधारणा विषयांच्या तज्ञांकडून केली जात असल्याचे एनसीईआरटी प्रमुख दिनेश सकलानी यांनी सांगितले आहे.
अभ्यासक्रमाचे भगवेकरण करण्याचा कुठलाच प्रयत्न नाही. पाठ्यापुस्तकांमधील सर्व बदल हे पुरावे आणि तथ्यावर आधारित आहेत सकलानी यांनी म्हटले आहे. आम्ही विद्यार्थ्यांना दंगलीविषयी का शिकवावे? आमचा उद्देश हिंसक आणि नैराश्याने ग्रस्त नागरिक निर्माण करणे नाही. पाठ्यापुस्तकांमध्ये दुरुस्ती एक जागतिक प्रथा असून ही शिक्षणाच्या हिताची असल्याचे उद्गार एनसीईआरटी प्रमुखांनी काढले आहेत.
एखादी गोष्ट अप्रासंगिक ठरली तर ती बदलावी लागेल. शाळांमध्ये इतिहास हा वस्तुस्थिती समजविण्यासाठी शिकविला जातो. शाळांना युद्धभूमीचे स्वरुप देण्यासाठी इतिहास शिकविला जात नाही. द्वेष आणि हिंसा शाळेत शिकविण्याचा विषय नाही. अभ्यासक्रमांमध्ये त्यावर भर दिला जाऊ नये. पुस्तकांमध्ये दुरुस्ती विषयतज्ञांकडून केली जाते. मी या प्रक्रियेत हस्तक्षेप करत नसल्याचे स्पष्टीकरण सकलानी यांनी गुजरात दंगली-बाबरीचा विषय हटविण्याच्या मुद्द्यावर दिले आहे.
इयत्ता 12 वीच्या राजशास्त्राच्या पाठ्यापुस्तकातील बाबरीचा उल्लेख हटविण्यात आला आहे. बाबरीऐवजी तिला ‘तीन गुंबद असणारी संरचना’ असे संबोधिण्यात आले आहे. तसेच नव्या पुस्तकात सर्वोच्च न्यायालयाच्या अयोध्या विषयक निर्णयाचा उल्लेख करण्यात आला आहे.









