वृत्तसंस्था/झाशी
हॉकी इंडियातर्फे येथे शुक्रवारपासून 15 व्या वरिष्ठ पुरुषांच्या राष्ट्रीय हॉकी चॅम्पियनशिप स्पर्धेला प्रारंभ होत असून ही स्पर्धा पहिल्यांदाज नव्या स्वरुपात खेळविली जाणार आहे. या स्पर्धेमध्ये 30 संघांचा समावेश असून ते तीन गटात विभागण्यात आले आहेत. सदर स्पर्धा 15 एप्रिलपर्यंत चालणार आहे. झाशीच्या मेजर ध्यानचंद हॉकी स्टेडियमवर ही स्पर्धा नव्या तीन विभागात खेळविली जाणार आहे. गेल्या मार्चमध्ये वरिष्ठ महिलांची राष्ट्रीय हॉकी चॅम्पियनशिप स्पर्धा झाशीमध्ये खेळविण्यात आली होती.
झाशीमध्ये शुक्रवारपासून सुरू होणाऱ्या या स्पर्धेमध्ये अ, ब आणि क अशा तीन गटात हे संघ विभागण्यात आले आहेत. सदर स्पर्धेतील सामने प्रमोशन आणि रिलीगेशन धर्तीवर खेळविले जातील. सदर स्पर्धेच्या जेतेपदासाठी अ गटातील सर्वाधिक संघांमध्ये चुरस राहिल. ब गटात खेळणाऱ्या संघांना पुढील हंगामात अ गटात स्थान मिळविण्यासाठी झगडावे लागेल. तर क गटातील संघ पुढील स्पर्धेसाठी ब गटात प्रवेश करण्यासाठी सामने खेळतील. ब आणि क गटातील सामन्यांना 4 एप्रिलपासून प्रारंभ होईल तर अ गटातील सामन्यांना 8 एप्रिलपासून सुरुवात होईल.
देशातील अव्वल 12 संघांचा अ गटात समावेश असून यामध्ये विद्यमान विजेता ओडीशा, विद्यमान उपविजेता हरियाणा तसेच पंजाब, मध्यप्रदेश, महाराष्ट्र, झारखंड, उत्तरप्रदेश, तामिळनाडू, बंगाल, कर्नाटक, पुडुचेरी यांचा समावेश आहे. या गटातील प्रत्येक संघ दुसऱ्या गटातील प्रत्येक संघाबरोबर एकदा लढत देतील. त्यानंतर बादफेरी टप्प्याला प्रारंभ होईल. प्रत्येक गटातील आघाडीचे दोन संघ बादफेरीसाठी (उपांत्यपूर्व) फेरीसाठी पात्र ठरतील. बाद फेरीचा टप्पा 12 एप्रिलपासून तर त्यानंतर उपांत्य फेरीचे सामने 13 एप्रिलला तसेच अंतिम आणि तिसऱ्या आणि चौथ्या स्थानासाठीचे सामने 15 एप्रिलला खेळविले जातील. अ गटातील गुणवारीत शेवटच्या दोन स्थानावरील संघ पुढील वर्षीच्या हंगामासाठी ब गटात राहतील.
ब गटामध्ये 10 संघांचा समावेश राहिल. या संघांमध्ये सामने खेळविले जाणार असून अ गटात स्थान मिळविण्यासाठी त्यांच्यात चुरस राहिल. हे 10 संघ दोन गटात विभागण्यात आले आहेत. अ गटात चंदीगढ, गोवा, तेलंगणा, आंध्रप्रदेश आणि उत्तराखंड तर ब गटात दिल्ली, मिझोराम, दादरा-नगर हावेली आणि दिव-दमण, केरळ, आसाम यांचा सहभाग आहे. ब गटातील आघाडीच्या दोन संघांना पुढील हंगामासाठी अ गटात स्थान मिळेल. तर शेवटच्या दोन संघांचा पुढील वर्षासाठी क गटात समावेश राहिल.









