वृत्तसंस्था / मियामी गार्डन्स
रविवारी येथे झालेल्या मियामी खुल्या आंतरराष्ट्रीय टेनिस स्पर्धेत झेकच्या 19 वर्षीय याकुब मेनसिकने पुरुष एकेरीचे जेतेपद मिळविताना सर्बियाच्या अनुभवी आणि माजी टॉपसिडेड नोव्हॅक जोकोविचला पराभवचा धक्का देत चकीत केले. या पराभवामुळे जोकोविचला एटीपी टूरवरील शतकी जेतेपद मिळविण्याच्या संधीने हुलकावणी दिली.
पुरुष एकेरीच्या अंतिम सामन्यात याकुब मेनसिकने जोकोविचचा 7-6 (7-4), 7-6 (7-4) अशा सरळ सेट्समध्ये पराभव केला. मेनसिकचे एटीपी टूरवरील हे पहिले विजेतेपद आहे. या स्पर्धेत जोकोविचने उपांत्य फेरीपर्यंत आपली विजयी घोडदौड कायम राखत 100 वे एटीपी टूरवरील जेतेपद मिळविण्यासाठी तो सज्ज झाला होता. पण मेनसिकने त्याचे स्वप्न अधुरे ठरविले. जोकोविचला शतकी जेतेपदासाठी आणखी काही दिवस वाट पहावी लागेल. मेनसिकने या सामन्यात ताशी 130 मैल वेगाने वेगवान सर्व्हिस केली. मेनसिकने या सामन्यात 14 बिनतोड सर्व्हिसची नोंद केली. मेनसिकने पहिल्या आणि दुसऱ्या टायब्रेकरमधील सेट्समध्ये एकूण चारवेळा जोकोविचची सर्व्हिस भेदली. जोकोविचने यापूर्वी मियामी टेनिस स्पर्धा सहावेळा जिंकली आहे. 2007 साली जोकोविचने पहिल्यांदा मियामी टेनिस स्पर्धा जिंकली होती. या अंतिम सामन्यावेळी पावसाचा अडथळा आल्याने सुमारे साडेपाच तासांचा वेळ वाया गेला.
या स्पर्धेत महिला दुहेरीचे जेतेपद रशियाची मीरा अँड्रीव्हा आणि डायना स्नायडेर यांनी पटकाविले. अंतिम सामन्यात मीरा आणि डायना यांनी ख्रिस्टीना बुस्का आणि केटो यांचा 6-3, 6-7 (5-7), 10-2 असा पराभव केला.









