जपानमधील एका प्राणीसंग्रहालयाच्या व्यवस्थापनाने काढलेला आदेश सध्या अनेकांच्या चर्चेचा विषय झाला आहे. हे संग्रहालय पाहण्यासाठी कोणत्याही पुरुषाने येथे एकट्याने येऊ नये. त्याच्यासह त्याचे कुटुंब, किंवा कोणत्यातरी महिलेसह येथे आले पाहिजे. तो कुटुंब घेऊन आला, तर त्या कुटुंबात एक तरी महिला असणे आवश्यक आहे. असा विचित्र आदेश या प्राणीसंग्रहालय व्यवस्थापनाने का काढला, हे समजले तर आपल्याला आश्चर्य वाटल्यावाचून राहणार नाही. जपानच्या टोचिगी प्रांतात हे प्राणीसंग्रहालय आहे.
हे प्राणीसंग्रहालय ‘सहवासात्मक’ स्वरुपाचे किंवा इंटरअॅक्टिव्ह प्रकारचे आहे. याचा अर्थ असा की येथे येणारे लोक येथील मांजरे, श्वान किंवा अन्य निरुपद्रवी प्राण्यांसमवेत वेळ घालवू शकतात. या प्राण्यांना हाताळू शकतात किंवा त्यांना काही पदार्थ खायला घालू शकतात. येथील प्राणी पिंजऱ्यात कोंडलेले नाहीत. या संग्रहालयाचा प्रारंभ मागच्या वर्षीच झाला आहे. पण गेल्या वर्षभरात या संग्रहालयाच्या व्यवस्थापनाला असा अनुभव आला आहे, की येथे एकटे येणारे पुरुष येथे आलेल्या महिलांची छेड काढतात. त्यांच्या अंगचटीला जाण्याचा प्रयत्न करतात किंवा अन्य प्रकारे त्यांना त्रास देतात. अशा लोकांना असे करण्यापासून रोखण्याचा प्रयत्न व्यवस्थापनाने करुन पाहिला. पण त्यात यश आले नाही. त्यामुळे त्यांना एकट्या पुरुषांच्या येण्यावर बंदी घालावी लागली. पुरुषासमवेत कोणती तरी महिला असेल तर ते अन्य महिलांची छेड काढणार नाहीत असे तर्कशास्त्र या आदेशामागे आहे.
व्यवस्थापनाचा हा उपाय प्रभावी ठरत आहे. कारण ज्या पुरुषांसमवेत त्यांचे कुटुंब आहे, किंवा कोणी महिला सोबती आहे, तर अशा पुरुषांना येथे आलेल्या महिला किंवा तरुणींची छेड काढण्याचे धाडस होत नाही. कारण त्यांच्यासह आलेल्या महिलांसमोर ते असे करु शकत नाहीत. त्यामुळे हा निर्णय लागू केल्यापासून या प्राणीसंग्रहालयातील परिस्थिती बरीच सुधारल्याचे दिसत आहे.









