कुंकळ्ळीत महिला दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात दिनेश ना. देसाई यांचे प्रतिपादन
कुंकळ्ळी : आज सर्व क्षेत्रांत महिला पुरुषांच्या एबरोबरीने वावरत आहेत. यशस्वी पुरुषामागे महिलेची मोठी साथ असते असे म्हणत असताना पुरुषांनीही महिलांना तितकीच साथ का देऊ नये, असा सवाल बाळ्ळी सरकारी हायस्कूलचे निवृत्त शिक्षक दिनेश नाईक देसाई यांनी केला. आज पुरुषांनी महिलांना योग्य साथ देण्याची गरज असून त्यांची पुरेशी साथ महिलांना लाभल्यास त्या निश्चितच देशाच्या प्रगतीत आणखी उज्ज्वल कामगिरी बजावतील, असे ते म्हणाले कुंकळ्ळीत जागतिक महिला दिनानिमित्त नगरवाचनालयाने कला व संस्कृती खात्याच्या सहकार्याने आयोजित केलेल्या कार्यक्रमात ते प्रमुख अतिथी म्हणून बोलत होते. नगरवाचनालय सभागृहात झालेल्या या कार्यक्रमात निमंत्रित पाहुणे म्हणून पत्रकार सुनील फातर्पेकर आणि खोखो खेळाचे राष्ट्रीय स्तरावरील पंच तसेच कुंकळळी युनायटेड हायस्कूलचे निवृत्त शिक्षक लिमा लुईस तसेच नगरवाचनालयाचे मुख्य अधिकारी महेश गावकर व्यासपीठावर उपस्थित होते.
महिला-पुरुष समानतेच्या जोडीने माणुसकीचे मूल्यही महत्त्वाचे आहे. कौटुंबिक, सामाजिक, राजकीय, आर्थिक, साहित्यिक, सांस्कृतिक अशा सर्वच स्तरांवर महिलेचा स्वतंत्र व्यक्ती म्हणून विचार व्हायला हवा. जग आज फार झपाटय़ाने बदलत चालले आहे. अनेक क्षेत्रांत महिलांनी मोठी मजल मारली आहे, असे देसाई म्हणाले. आपला वेळ वाचन करण्यासाठी राखून ठेवा. कुंकळ्ळीत सुसज्ज वाचनालय उपलब्ध आहे. या वाचनालयाचा लाभ घ्यावा, असे आवाहन त्यांनी केले. सुनील फातर्पेकर यांनीही महिलांच्या धाडसाचे कौतुक केले. महिला स्वबळावर काहीही करू शकते हे त्यांनी कृतीतून दाखवले आहे. महिलांनी सरकारी योजनांचा लाभ घ्यावा आणि वेगवेगळ्या क्षेत्रांत पारंगत व्हावे. काबाडकष्ट करताना मानसिक स्वास्थ्याकडेही तेवढेच लक्ष द्यावे. सावित्रीबाई फुले यांनी महिलांना शिक्षणाची दारे खुली केली. महिलांनी त्यांच्यापासून शिकण्यासारखे खूप आहे, असे ते म्हणाले. पुस्तक हे ज्ञानाचे माध्यम आहे. नागरवाचनालयात वाचनीय पुस्तके उपलब्ध आहेत. आपला वेळ वाचनासाठीही द्या, असे आवाहन फातर्पेकर यांनी केले. शोभना फळदेसाई यांनी महिलांना उद्योग-व्यवसायांविषयी मार्गदर्शन केले. महेश गावकर यांनी सांगितले की, नगरवाचनालयात मराठी, हिंदी, कोकणी, इंग्रजी मिळून सुमारे 15 हजार पुस्तके आहेत. शिवाय विविध नियतकालिके, वर्तमानपत्रे येतात, सूत्रसंचालन वाचनालयाच्या कर्मचारी शोभना देसाई यांनी केले, तर आभार कर्मचारी रूपा भगत यांनी मानले.









