बेळगाव-मिरज मार्गावर धावण्याची शक्यता
बेळगाव : बेळगावच्या सांबरा रेल्वेस्थानकावर सध्या एक मेमू रेल्वे थांबविण्यात आली आहे. बेळगाव ते मिरज या दरम्यान ही मेमू रेल्वे चालविली जाण्याची शक्यता आहे. असे झाल्यास या दोन शहरांदरम्यान प्रवास करणाऱ्यांची मोठी सोय होणार असून बेळगावला ही पहिली मेमू रेल्वेसेवा मिळणार आहे. मेन लाईन इलेक्ट्रिक मल्टीपल युनिट (मेमू) रेल्वे ही दोन शहरांना जोडणारी इलेक्ट्रिक रेल्वे आहे. यापूर्वी हुबळी रेल्वेस्थानकातून मेमू रेल्वे धावत होत्या. परंतु बेळगावला मेमू रेल्वे उपलब्ध नव्हती. मुंबई येथील लोकल ट्रेनप्रमाणे मेमू रेल्वेमध्ये बसण्याची व्यवस्था करण्यात आलेली असते. त्यामुळे अधिकाधिक प्रवासी या रेल्वेतून प्रवास करू शकतात. मागील चार दिवसांपासून सांबरा रेल्वेस्थानकात नवीन मेमू रेल्वे पार्किंगसाठी आणण्यात आली आहे. लवकरच बेळगाव-मिरज अथवा लोंढा-मिरज या मार्गावर ही मेमू रेल्वे धावण्याची शक्यता आहे. त्यामुळे ही नवीन मेमू बेळगावमध्ये दाखल होणार का? हे लवकरच समजणार आहे.









