30 रोजी हिंडलगा येथे भूमिपूजन : तालुका म. ए. समितीच्या बैठकीत ठराव
प्रतिनिधी/ बेळगाव
सीमाप्रश्नाच्या आंदोलनातील हुतात्म्यांचे भव्य स्मारक हिंडलगा येथे उभारण्यात येणार आहे. हुतात्म्यांच्या स्मृती जपण्यासोबत म. ए. समिती, तसेच मराठी भाषिकांच्या कार्यक्रमासाठी एक सभागृह बांधले जाणार आहे. याचे भूमिपूजन गुढीपाडव्याच्या शुभमुहूर्तावर रविवार दि. 30 रोजी सायंकाळी 4 वाजता होणार आहे. हुतात्मा स्मारकाच्या निर्माणासाठी 51 जणांची कमिटी स्थापन करण्यात येणार असल्याचा ठराव शनिवारी आयोजित तालुका म. ए. समितीच्या बैठकीत करण्यात आला.
मराठा मंदिर सभागृहात झालेल्या तालुका म. ए. समितीच्या बैठकीच्या अध्यक्षस्थानी माजी आमदार मनोहर किणेकर होते. युवानेते आर. एम. चौगुले यांच्याकडे बांधकाम कमिटीची जबाबदारी देण्यात आली आहे. त्यांनी हुतात्मा स्मारकाच्या बांधकामाविषयी माहिती दिली. पहिल्या मजल्यावर 3500 चौरस फूट बांधकाम केले जाणार असून त्यामध्ये कार्यालय व गेस्ट हाऊसची व्यवस्था असणार आहे. दुसऱ्या मजल्यावर सभागृह, व्यासपीठ याची व्यवस्था असेल. तर तिसऱ्या मजल्यावर हुतात्म्यांच्या स्मृती जपणारे सभागृह उभारले जाणार असल्याची माहिती त्यांनी दिली.
51 जणांच्या स्मारक कमिटीमध्ये हुतात्म्यांचे वारसदार, जखमी हुतात्मे, त्याचबरोबर तालुका, शहर व खानापूर तालुक्यातील सदस्य सहभागी होणार आहेत. त्याचबरोबर स्मारकासाठी जमीन देणाऱ्या बी. आय. पाटील यांच्या कुटुंबीयांना स्थान दिले जाणार आहे. स्मारकासाठी देण्यात आलेल्या जमिनीची कायदेशीर प्रक्रिया योग्यरित्या पूर्ण केल्याबद्दल सेक्रेटरी अॅड. एम. जी. पाटील यांचे अभिनंदन करण्यात आले.
स्मारकाच्या देणगीसाठी 25 जणांची कमिटी केली जाणार असून त्यामध्ये शहर व खानापूरचे पाच सदस्य तर उर्वरित तालुक्यातील सदस्य असणार आहेत. सर्व मराठी भाषिकांच्या देणगीतून हे हुतात्मा स्मारक उभारले जाणार आहे. ज्या नागरिकांना स्मारकासाठी देणगी द्यावयाची असेल त्यांनी सढळ हस्ते द्यावी, असे आवाहन मनोहर किणेकर यांनी केले.
यावेळी सेक्रेटरी अॅड. एम. जी. पाटील, आर. के. पाटील, मनोहर हुंदरे, डी. बी. पाटील यांच्यासह इतर कार्यकर्त्यांनी मनोगत व्यक्त केले. बैठकीला दीपक पावशे, बी. एस. पाटील, लक्ष्मण होनगेकर, लक्ष्मण मासेकर, रामचंद्र मोदगेकर, मल्लाप्पा पाटील, शंकर कोणेरी, मोहन बेनके यांच्यासह मोठ्या संख्येने कार्यकर्ते उपस्थित होते.









