प्रतिनिधी /बेळगाव
डॉ. पुट्टराज गवई प्रति÷ान आणि कन्नड आणि संस्कृती विभाग, बेंगळूर यांच्या संयुक्त विद्यमाने गानयोगी पंडित पंचाक्षरी गवई यांचा 78 वा स्मृती संगीतोत्सव 16 जुलै रोजी बेळगाव येथील आयएमईआर कॉलेजच्या सभागृहात पूज्य श्री डॉ. तोंटद सिद्धराम महास्वाजी आणि जिल्हाधिकारी नीलेश पाटील यांच्या अध्यक्षतेखाली झाला. प्रमुख पाहुणे म्हणून कन्नड व सांस्कृतिक खात्याचे सहसंचालक बसवराज हुग्गार होते. ख्यातनाम तबला वादक, पद्मविभूषण पंडित अनिंदो चटर्जी विशेष निमंत्रित म्हणून उपस्थित होते.
या संगीतोत्सवात ऐश्वर्या देसाई, धारवाड यांचे गायन आणि पंडित बी. एस. मठ व विदुषी अक्कदेवी मठ यांची व्हायोलिन जुगलबंदी आयोजित करण्यात आली होती. गानयोगींच्या प्रतिमेचे पूजन मान्यवरांनी केले. डॉ. तोंटद सिद्धराम महास्वामी यांनी आशीर्वचन केले. प्रमुख पाहुण्यांच्या भाषणानंतर ऐश्वर्या देसाई यांच्या गायनाने मैफलीला सुरुवात झाली. त्यांनी राग यमनमध्ये बडा ख्याल आणि छोटा ख्याल आणि त्यानंतर राग सूर मल्हार व एक वचन सादर करून सांगता केली.
पंडित बी. एस. मठ आणि अक्कदेवी मठ यांनी व्हायोलिन जुगलबंदीत राग बिहाग सादर केला. त्यानंतर भैरवीने मैफलीची सांगता केली. त्यांची कन्या वीणा मठ यांनीही व्हायोलीन साथसंगत केली. सर्व कलाकारांना केशव जोशी, निसार अहमद, सारंग कुलकर्णी यांनी साथसंगत केली. तन्मयी सराफ आणि स्तुती कुलकर्णी यांनी तानपुरा साथ केली. यावेळी संस्थेचे पदाधिकारी महाबळेश्वर हसिनाळ, शंकर कुंबी, विख्यात गायक पंडित व्यंकटेशकुमार, ऍड. उदय देसाई यांच्यासह बहुसंख्य श्रोते उपस्थित होते.









