वृत्तसंस्था / दुबई
नुकत्याच घोषित करण्यात आलेल्या महिलांच्या वनडे फलंदाज आणि गोलंदाजांच्या ताज्या मानांकन यादीत भारताची उपकर्णधार स्मृती मानधनाने फलंदाजांच्या यादीत आपले अग्रस्थान कायम राखले आहे तर गोलंदाजांच्या यादीत भारताची दिप्ती शर्मा हिने तिसऱ्या स्थानावर झेप घेतली आहे.
फलंदाजांच्या ताज्या मानांकन यादीत स्मृती मानधना आणि दुसऱ्या स्थानावरील इंग्लंडची कर्णधार नॅट सिव्हेर ब्रंट यांच्यात 83 मानांकन गुणांचा फरक आहे. गोलंदाजांच्या मानांकन यादीत इंग्लंडची फिरकी गोलंदाज सोफी इक्लेस्टोन पहिल्या स्थानावर आहे.
सध्या सुरू असलेल्या आयसीसीच्या महिलांच्या विश्वचषक क्रिकेट स्पर्धेत स्मृती मानधनाने सलग दोन अर्धशतके झळकविली. इंग्लंड विरुद्धच्या सामन्यात तिने 88 धावा केल्या. पण भारताला हा सामना थोडक्यात गमवावा लागला. 2025 च्या सप्टेंबर महिन्यातील आयसीसीच्या सर्वोत्तम महिला क्रिकेटपटूंचा पुरस्कारही स्मृती मानधनाने मिळविला. ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या वनडे मालिकेत मानधनाची फलंदाजी दमदार झाली होती. फलंदाजांच्या ताज्या मानांकन यादीत ऑस्ट्रेलियाची कर्णधार अॅलिसा हिलीने तिसऱ्या स्थानावर झेप घेतली आहे. सध्या सुरू असलेल्या विश्वचषक क्रिकेट स्पर्धेत हिलीने सलग दोन सामन्यात दमदार शतके झळकविली. द.आफ्रिकेच्या ब्रिट्सने या यादीत नववे स्थान मिळविले आहे. भारतीय संघाची कर्णधार हरमनप्रित कौर 15 व्या स्थानावर असून ऑस्ट्रेलियाची सलामीची फलंदाज लीचफिल्ड 17 व्या स्थानावर, इंग्लंडची हिथेर नाईट 18 व्या स्थानावर आहे.
गोलंदाजांच्या ताज्या मानांकन यादीत भारताच्या दिप्ती शर्माने तिसऱ्या स्थानार झेप घेतली आहे. दिप्तीने महिलांच्या विश्वचषक क्रिकेट स्पर्धेतील पाच सामन्यात 13 गडी बाद केले आहेत. ऑस्ट्रेलियाची फिरकी गोलंदाज अॅलेना किंग सातव्या स्थानावर आहे. पाकची नशरा संधू 11 व्या स्थानावर, सादिया अकबाल 14 व्या आणि फातिमा सना 24 व्या स्थानावर आहे. ऑस्ट्रेलियाची गार्डनर वनडे अष्टपैलुंच्या मानांकन यादीत पहिल्या स्थानावर आहे. लंकेची कर्णधार चमारी अटापटू सातव्या स्थानावर आहे.









