जिल्हा पंचायतीचा पुढाकार : घरोघरी भेटी देऊन लोकांमध्ये जागृती : दोन्ही योजनांचे मे महिन्यात नूतनीकरण
बेळगाव : अपघातामुळे मृत्यू आणि जखमी झालेल्यांच्या कुटुंबाला आर्थिक आधार देणाऱ्या महत्त्वाच्या विमा योजनांचा लाभ देण्यासाठी सरकारने राज्यव्यापी सदस्यत्व नोंदणी मोहीम सुरू केली आहे. राज्यातील अपघातांची संख्या दरवषी वाढत आहे. दररोज दहा कुटुंबांना आपल्या कुटुंबाचा आधारस्तंभ गमावून त्रास सहन करावा लागत आहे. त्यामुळे संबंधित अवलंबितांना आधार देण्यासाठी देशातील प्रमुख जीवन विमा आणि अपघात विमा योजनांमध्ये नोंदणी केली जात आहे.
विमा योजनांचा लाभ मिळवून देण्यासाठी जागृती
केंद्र सरकारच्या प्रधानमंत्री सुरक्षा विमा योजना आणि प्रधानमंत्री जीवन ज्योती विमा योजनेसाठी नोंदणी करण्यासाठी जनतेला पटवून देण्यासाठी घरोघरी भेटी दिल्या जात आहेत. यामध्ये विविध खात्यातील शासकीय व कंत्राटी कर्मचारी, रोहयो सेविका, अशा व अंगणवाडी कार्यकर्त्या व स्थानिक संस्थांचे लोकप्रतिनिधी या विमा योजनांचा लाभ मिळवून देण्यासाठी जागृती करत आहेत.
मोहिमेचे उद्दिष्ट साध्य करण्याच्या सूचना
सर्व तालुका पंचायतांच्या कार्यकारी अधिकाऱ्यांना नोडल अधिकारी म्हणून यासाठी नियुक्त करण्यात आले आहे. खासगी बँक आणि टपाल अधिकाऱ्यांशी समन्वय साधून मोहिमेचे उद्दिष्ट साध्य करण्याच्या सूचना दिल्या आहेत.
अपघात घडल्यावर अडचणीतून बाहेर काढण्यास मदत
या अभियानाचा एक भाग म्हणून तालुका आणि ग्रामपंचायत स्तरावरील रोहयो योजना कामगार व इतरांच्या माध्यमातून गावागावातील घरांना भेटी दिल्या जात आहेत. 18 वर्षावरील प्रत्येकाने नोंदणी केल्यास अपघात घडल्यावर कुटुंबाला अडचणीतून बाहेर काढण्यास मदत होणार आहे. त्यामुळे लोकांनी या विमा योजनांसाठी बँक किंवा पोस्ट कार्यालयामध्ये नोंदणी करावी. यासाठी बचत खाते असणे गरजेचे आहे.
काय आहे योजना?
प्रधानमंत्री जीवन ज्योती विमा योजनेअंतर्गत 18 ते 50 वयोगटातील व्यक्तींनी वार्षिक 436 ऊपये भरले पाहिजेत. नोंदणीकर्त्याचा कोणत्याही करणाने मृत्यू झाल्यास त्याच्यावर अवलंबून असलेल्या कुटुंबातील सदस्यांना दोन लाख ऊपयांची विमा रक्कम मिळते. प्रधानमंत्री सुरक्षा विमा योजनेअंतर्गत 18 ते 70 वयोगटातील व्यक्तीनी वार्षिक वीस ऊपये भरल्यास त्यावर अवलंबून असलेल्या कुटुंबीयांना दोन लाख ऊपये आणि कायमस्वरूपी किंवा अंशत: अपंगत्व आल्यास नोंदणी करणाऱ्याला एक लाख ऊपये विमा रकमेची रक्कम मिळणार आहे. या दोन्ही योजनांचे मे महिन्यात नूतनीकरण करावे लागणार आहे.
50 हजारांहून अधिक जणांची नोंदणी
खात्याच्या सूचनेनुसार विमा योजनेअंतर्गत नोंदणी करून घेण्यासाठी अभियान सुरू करण्यात आले आहे. बेळगावात पुढील दोन महिन्यात 50 हजारांहून अधिक जणांची नोंदणी करून घेण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे.
-राहुल शिंदे, मुख्य कार्यकारी अधिकारी, जि. पं. बेळगाव









