अध्यक्ष देवानंद नाईक यांची माहिती : चार जणांना कार्यकारिणीवरूनही हटवले
पणजी : समाजातच राहून समाजाच्या समितीविऊद्ध वावरणे, समाजहिताविऊद्ध काम करणे, कारवाया करणे या प्रकारामुळे गोमंतक भंडारी समाजातून सात जणांचे सदस्यत्व रद्द करण्यात आले आहे. या सात जणांपैकी चार जणांना समाजाच्या कार्यकारणी समितीवरूनही हटविण्यात आले आहे, अशी माहिती गोमंतक भंडारी समाजाचे अध्यक्ष देवानंद नाईक यांनी दिली. पणजी येथे समाजाच्या कार्यालयात काल शुक्रवारी घेण्यात आलेल्या बैठकीत देवानंद नाईक यांनी ही माहिती दिली. यावेळी गोमंतक भंडारी समाज समितीचे माजी अध्यक्ष अशोक नाईक, सचिव किशोर नाईक, सदस्य दिलीप नाईक, मंगलदास नाईक, अवधूत नाईक, कृष्णकांत गोवेकर, संजय पर्वतकर, विजय कांदोळकर, प्रकाश कळंगुटकर, कृष्णनाथ चोपडेकर, वासुदेव विर्डीकर उपस्थित होते.
अध्यक्ष देवानंद नाईक यांनी सांगितले की, गेल्या आठ महिन्यांपासून गोमंतक भंडारी समाजाच्या एकाही बैठकीला उपस्थित न राहिलेले कार्यकारिणी सदस्य विनय ऊर्फ अविनाश काशिनाथ शिरोडकर, बाबू गोपाळ नाईक, परेश गुऊदास नाईक, विनोद काशिनाथ नाईक यांच्यासह समाजाचे सदस्य असलेले प्रभाकर खुशाली नाईक, रोहिदास लक्ष्मण नाईक, हनुमंत वसंत नाईक हे समाजाच्या विऊद्ध कारवाया करीत राहिले. अनेकवेळा त्यांना समजावण्याचा प्रयत्न करूनही त्यांनी भूमिका बदलली नाही. त्यामुळे अखेर या सातही जणांचे समाजाचे सदस्यत्व रद्द करण्याचा निर्णय घेण्यात आला, असेही अध्यक्ष देवानंद नाईक म्हणाले.
समाजाच्या घटनेनुसार निर्णय
या सातही जणांचे समाजाचे सदस्यत्व रद्द करण्यापूर्वी 2 जुलै 2025 रोजी समाजाच्या कार्यकारिणी बैठकीत तसा ठराव घेण्यात आला. त्यानंतर सर्व सोपस्कर करून गुऊवारी 17 जुलै रोजी जिल्हा निबंधकांकडे याबाबतची प्रक्रिया करण्यात आली. त्यानंतर आज समाजाच्या कार्यालयात बैठक घेऊन सातही जणांचे समाजाचे सदस्यत्व रद्द करण्यात आले. समाजाच्या घटनेनुसार, हा निर्णय घेण्यात आल्याचे ते म्हणाले. दरम्यान, समाजाच्या कारिकारीणी समितीवर असलेले अमर शुभा नाईक शिरोडकर हेही गेल्या काही महिन्यांपासून बैठकीला उपस्थित राहू शकले नाही. त्यांना काही कारणास्तव बैठकीला हजर राहता येत नसल्याने त्यांच्या इच्छेनुसार त्यांना कार्यकारिणीवरून मुक्त करण्यात आले आहे. परंतु ते समाजाचे सदस्य म्हणून कायम समाजासोबतच आहेत, असे सचिव किशोर नाईक यांनी सांगितले.
सदस्यत्व रद्द करण्याचा अधिकार नाही : सांतीनेजकर
या सदस्यत्व रद्द प्रकरणी उपेंद्र गटाचे सुनिल सांतीनेजकर म्हणाले की ज्या सात सदस्यांचे सदस्यत्व रद्द करण्यात आले आहे, ते सर्वजण उपेंद्र गावकर गटातील आहेत. मात्र त्यांचे सदस्यत्व रद्द करण्याचा अधिकार देवानंद नाईक यांच्या अध्यक्षतेखालील समितीला नाही. एवढेच नव्हे तर उपेंद्र गावकर यांच्या समितीलाही तसेच अधिकार नाहीत. कारण या दोन्ही समित्या अधिकृतरित्या मान्यताप्राप्त नाहीत.









