कर्तव्यात कसूर केल्याप्रकरणी कोकण विभागीय आयुक्तांनी केले रद्द
न्हावेली / वार्ताहर
सावंतवाडी तालुक्यातील मळगाव ग्रामपंचायतचे सरपंच सौ. स्नेहल उदय जामदार यांचे सरपंच व सदस्य पद रद्द करण्यात आले आहे.
कर्तव्यात कसूर केल्याप्रकरणी कोकण विभागीय आयुक्त डॉ. महेंद्र कल्याणकर यांनी हे पद रद्द केले आहे. याबाबत सखाराम नरहरी गावकर व इतर २३ ग्रामस्थ, (रा. मळगाव) यांनी तक्रार दाखल केली होती.
या तक्रार अर्जानुसार गट विकास अधिकारी, पंचायत समिती, सावंतवाडी यांनी चौकशी करून मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद सिंधुदुर्ग यांना अहवाल सादर केला होता. या अहवालाच्या अनुषंगाने मळगाव ग्रामपंचायत सरपंच स्नेहल उदय जमादार यांनी ग्रामपंचायतीमध्ये कामकाज करताना कर्तव्यात कसूर केल्याचे दिसून येत असल्याने त्यांच्यावर महाराष्ट्र ग्रामपंचायत अधिनियमानुसार कारवाईसाठीचा प्रस्ताव मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद सिंधुदुर्ग यांनी कोकण विभागीय आयुक्त कार्यालयाकडे सादर केला होता. या अहवालानुसार कोकण विभागीय आयुक्त यांनी मळगाव सरपंच स्नेहल उदय जामदार यांना सरपंच व सदस्य पद रद्द करण्याचा निर्णय दिला आहे. त्यांच्यावर दोषारोप निश्चित करुन निर्णय देण्यात आला आहे. या प्रकरणी झालेली अनियमिततेची रक्कम संबंधित जबाबदार असणारे सरपंच व ग्रामसेवककडून वसूल करा, असे आदेश कोकण विभागीय आयुक्त डॉ. महेंद्र कल्याणकर यांनी दिले आहेत.









