मागील दशकाच्या तुलनेत 65 टक्के अधिक वेग : अध्ययनातून खुलासा
वृत्तसंस्था/ काठमांडू
सुमारे 2 अब्ज लोकांना पाणी उपलब्ध करविणारे हिमालयीन ग्लेशियन हवामान बदलामुळे पूर्वीपेक्षा अधिक वेगाने वितळत आहेत. हिमालयीन ग्लेशियर वितळत असल्याने अब्जावधी लोकांना अत्यंत मोठ्या आपत्तींचा सामना करावा लागत आहे. इंटरनॅशनल सेंटर फॉर इंटीग्रेटेड माउंटेन डेव्हलपमेंटच्या एका अहवालानुसार मागील दशकाच्या तुलनेत 2011 पासून 2020 पर्यंत ग्लेशियर 65 टक्के अधिक वेगाने वितळत आहेत.
हिमखंड वितळण्याचा वेग अनपेक्षित अन् चिंता वाढविणारा आहे. हिमखंड वितळण्याचा वेग इतका अधिक असेल याची आम्हालाही कल्पना नव्हती असे अध्ययनाचे प्रमुख लेखक फिलिप्स वेस्टर यांनी सांगितले आहे.
हिमालयीन क्षेत्रातील ग्लेशियर सुमारे 240 कोटी लोकांसाठी महत्त्वपूर्ण जलस्रोत आहे. हिमालयात उगम पावणाऱ्या नद्यांना ग्लेशियरमधूनच पाणी उपलब्ध होत असते, असे अहवालात म्हटले गेले आहे. नेपाळमध्ये स्थित इंटरनॅशनल सेंटर फॉर इंटीग्रेटेड माउंटेन डेव्हलपमेंट ही एक आंतरशासकीय संघटना असून यात अफगाणिस्तान, बांगलादेश, भूतान, चीन, भारत, म्यानमार आणि पाकिस्तान सामील आहेत.
हिमालयीन ग्लेशियर जगातील 10 सर्वात महत्त्वपूर्ण नदीप्रणालींना जलपुरवठा करतात, यात गंगा, सिंधू, येलो, मेकांग आणि इरावती सामील आहे. तर प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्ष स्वरुपात अब्जावधी लोकांना अन्न, ऊर्जा, स्वच्छ हवा अन् उत्पन्नाचे साधन देखील या जलस्रोतांमुळे प्राप्त होत असते.
पुढील 100 वर्षांमध्ये आम्ही सर्व ग्लेशियर अन् नद्या गमावून बसू, मग किती वाईट अवस्था असेल याची कल्पनाही करता येणार नसल्याचे वेस्टर यांनी म्हटले आहे. हिंदुकुश हिमालय (एचकेएच) भाग 3500 किलोमीटरमध्ये पसरलेला आहे. बांगलादेश, भूतान, चीन, भारत, म्यानमार, नेपाळ आणि पाकिस्तानातून हा भाग जातो. येथील ग्लेशियरांमधून बाहेर पडणाऱ्या नद्यांमधून 24 कोटी लोकांना पाणी मिळते. हे लोक पर्वतीय भागांमध्ये राहतात. याचबरोबर सखल मैदानी भागात राहणाऱ्या 165 कोटी लोकांना या नद्यांमधून पाणी मिळत असते.
सद्यकाळात कार्बन उत्सर्जनाचे प्रमाण पाहता या शतकाच्या अखेरपर्यंत 75-80 टक्के ग्लेशियर वितळून जातील. तर औद्योगिक पूर्व कालखंडाच्या तुलनेत 1-2 अंश सेल्सिअसने तापमान वाढल्यास 30 ते 50 टक्के बर्फ संपणार असल्याचे अहवालात म्हटले गेले आहे.
2100 पर्यंत तापमानात 3 अंशाने वाढ झाल्यास पूर्व हिमालय म्हणजेच नेपाळ, भूतानमधील भाग स्वत:च्या ग्लेशियरचा 75 टक्के हिस्सा गमावून बसतील. तर तापमान 4 अंश सेल्सिअसने वाढल्यास 80 टक्के ग्लेशियर वितळून जातील. नद्या कोरड्या पडतील किंवा त्यांची जलपातळी अत्यंत कमी होईल.
हे संकट टाळण्यासाठी आम्हाला तत्काळ पावले उचलावी लागतील. जर या नद्यांचे अस्तित्व संपुष्टात आल्यास जगभरात हाहाकार उडेल. गरीब लोकांना रोजगार गमवावा लागून मोठ्या प्रमाणात स्थलांतराची वेळ ओढवू शकते. अशा स्थितीत गृहयुद्धाची स्थिती निर्माण होऊ शकते असा इशारा अहवालात देण्यात आला आहे.









