वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
कोरियातील डेगू येथे सुरू असलेल्या 15 व्या आशियाई एअर गन नेमबाजी स्पर्धेत भारताचे नेमबाज मेहुली घोष आणि तिलोत्तमा सेन यांनी दोन सुवर्णपदके पटकावली.
या स्पर्धेत महिलांच्या 10 मीटर एअर रायफल नेमबाजीत भारताची मेहुली घोषने अंतिम फेरीत कोरियाच्या चो इयुनयांगचा 16-12 असा पराभव करत सुवर्णपदक पटकावले. या प्रकारात कजाकस्तानच्या ली ऍलेक्सेंड्राने कास्यपदक मिळवले. सदर स्पर्धेमध्ये कनिष्ठ महिलांच्या 10 मीटर एअर रायफल नेमबाजीत भारताच्या तिलोत्तमा सेनने सुवर्णपदक पटकावताना अंतिम फेरीत भारताच्या नॅन्सीचा 17-12 असा पराभव केला. भारताच्या नॅन्सीला रौप्यपदकावर समाधान मानावे लागले. जपानच्या नोबाटा मिसाकीने या क्रीडाप्रकारात कास्यपदक मिळवले आहे.
सदर स्पर्धेमध्ये भारतीय नेमबाजांनी आपल्या मोहिमेला चांगला प्रारंभ केला असून शुक्रवारी पहिल्या दिवशी भारताने एक सुवर्ण, एक रौप्य आणि एक कास्यपदक मिळवले होते. कनिष्ठ पुरुषांच्या 10 मी. एअर रायफल नेमबाजीत भारताच्या पनवारने सुवर्ण तर किरण जाधव रौप्यपदक पटकावले. कनिष्ठ पुरुषांच्या एअर रायफल नेमबाजीत भारताच्या श्री कार्तिक शबरीराज रवीशंकरने कास्यपदक मिळवले आहे.









