वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
बांगलादेश क्रिकेट संघातील अष्टपैलू मेहमुदुल्लाने टी-20 प्रकारातून निवृत्तीचे संकेत दिले आहेत. सध्या भारत आणि बांगलादेश यांच्यात तीन सामन्यांची टी-20 मालिका सुरू असून या मालिकेनंतर आपण क्रिकेटच्या या प्रकारातून निवृत्त होत असल्याचे सुतोवाच केले आहे.
भारत आणि बांगलादेश यांच्यातील या मालिकेतील शेवटचा सामना हैद्राबादमध्ये शनिवार दि. 12 ऑक्टोबर रोजी होत आहे. मेहमुदुल्लाचा टी-20 प्रकारातील हा शेवटचा सामना राहिल. 38 वर्षीय मेहमुदुल्लाने 2007 साली आपले आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण केले. त्याने 50 कसोटी, 232 वनडे आणि 139 टी-20 सामन्यात बांगलादेशचे प्रतिनिधीत्व केले आहे. 2021 साली मेहमुदुल्लाने कसोटी क्रिकेटमधून निवृत्ती पत्करली होती.









