वृत्तसंस्था / ढाका
पुढील महिन्यात होणाऱ्या लंकेविरुद्धच्या तीन सामन्यांच्या वनडे मालिकेसाठी बांगलादेश क्रिकेट मंडळाने अष्टपैलू मेहिदी हसन मिराजची कर्णधारपदी नियुक्ती केली आहे. मेहिदी हसनकडे एक वर्षासाठी कर्णधारपदाची जबाबदारी राहिल.
यापूर्वी बांगलादेश वनडे संघाचे नेतृत्व नजमुल हुसेन शांतोकडे सोपविण्यात आले होते. आता शांतोच्या जागी मेहिदी हसनची नियुक्ती करण्यात आली. मात्र बांगलादेश संघाच्या कसोटी संघाचे नेतृत्व शांतोकडे कायम राहणार असून लिटॉन दास टी-20 संघाचा कर्णधार राहिल. बांगलादेशने क्रिकेटच्या तिन्ही प्रकाराकरिता विविध कर्णधारांची नियुक्ती केली आहे.
बांगलादेशचा संघ लंकेच्या दौऱ्यात दोन कसोटी, तीन वनडे आणि तीन टी-20 सामने खेळणार आहे. हा दौरा 17 जून ते 16 जुलै असा राहिल. लंकेच्या दौऱ्यानंतर बांगलादेशचा क्रिकेट संघ भारताबरोबर ऑगस्ट महिन्यात वनडे आणि टी-20 मालिका मायदेशात खेळणार आहे. 27 वर्षीय मेहिदी हसन मिराजने आपल्या वैयक्तिक क्रिकेट कारकिर्दीत 105 वनडे सामने खेळले असून 2017 मार्चमध्ये त्याने आपले वनडे क्रिकेट पदार्पण केले होते. त्याने 105 वनडे सामन्यात 2 शतके आणि 6 अर्धशतकांसह 1617 धावा जमविल्या असून गोलंदाजीत त्याने 110 गडी बाद केले आहेत.









