वृत्तसंस्था /श्रीनगर
जम्मू-काश्मीरच्या माजी मुख्यमंत्री आणि पीडीपी प्रमुख मेहबूबा मुफ्ती यांनी केंद्रीय रस्ते परिवहन मंत्री नितिन गडकरी यांना पत्र लिहिले आहे. जम्मू-काश्मीरच्या मुख्यमंत्रिपदी असताना काश्मीर खोऱ्यात विविध भुयारी मार्ग निर्माण करण्यावरून गडकरींशी चर्चा झाली होती. या भुयारीमार्गांचे काम अद्याप सुरू झाले नसल्याचे मुफ्तींनी पत्रात नमूद केले आहे. मुघल रोडवरील भुयाराची निर्मिती सुरू करण्याची विनंती गडकरींना 2017 मध्ये केली होती. मुघल रोड भुयारीमार्ग निर्माण करण्यात आल्यास काश्मीर खोऱ्याला जम्मूमधील पीर पंजालशी सर्व ऋतूंमध्ये जोडता येणार आहे. हिवाळ्यात काश्मीर खोऱ्याचा उर्वरित देशाशी संपर्क तुटतो. खराब हवामान अन् भूस्खलनामुळे महामार्ग बंद होतो. गडकरी यांच्या कार्यकाळादरम्यान रस्त्यांचे जाळे वेगाने वाढले आहे, तसेच संपर्कव्यवस्था मोठ्या प्रमाणात निर्माण झाली. परंतु जम्मू-काश्मीरमधील रस्ते अन् संपर्कव्यवस्थेत फारसा बदल घडलेला नाही, यामुळे लोकांना आर्थिकदृष्ट्या नुकसान करावे लागत असल्याचे मुफ्ती यांनी पत्रात नमूद केले आहे.









