हिंदुत्वावरून वादग्रस्त वक्तव्य : टी. राजा सिंह यांची मागणी
वृत्तसंस्था/ हैदराबाद
पीडीपी प्रमुख मेहबूबा मुफ्ती यांच्या कन्या इल्तिजा मुफ्ती यांनी हिंदुत्वाचा उल्लेख करत सोशल मीडियावर आक्षेपार्ह पोस्ट शेअर केली आहे. आता यावरून देशातील राजकारण तापले आहे. इल्तिजा मुफ्ती यांनी हिंदुत्वाला एक आजार ठरविले होते. याप्रकरणी भाजप आमदार टी. राजा सिंह भडकले आहेत. इल्तिजा मुफ्ती यांचे वक्तव्य चुकीचे असून त्यांना याप्रकरणी त्वरित अटक केली जावी अशी मागणी राजा सिंह यांनी केली आहे.
इल्तिजा यांचे हे वक्तव्य हिंदूंच्या भावना दुखाविणारे आहे. जम्मू-काश्मीरच्या मुख्यमंत्र्यांनी इल्तिजा यांच्या या वक्तव्याची दखल घ्यावी आणि त्यांना त्वरित अटक करावी. कुणी कुणाला चप्पलेने मारत असल्यास इल्तिजा या आमच्या देवांबद्दल आक्षेपार्ह टिप्पणी करत आहेत. काश्मीरमध्ये कशाप्रकारे लोकांना धर्माच्या नावाखाली ठार करण्यात आले हे पूर्ण जग जाणून असल्याचे टी. राजा सिंह यांनी म्हटले आहे.
सोशल मीडियावर काही युवकांना मारहाण केली जात असल्याचे आणि त्यांना जय श्रीराम अशा घोषणा देण्यास भाग पाडले जात असल्याचा व्हिडिओ प्रसारित झाला होता. याच व्हिडिओवर इल्तिजा मुफ्ती यांनी टिप्पणी केली आहे. हिंदुत्व एक आजार असून त्याने लाखो भारतीयांना प्रभावित केले असल्याचे मुफ्ती यांनी म्हटले होते.
इल्तिजा मुफ्ती यांनी जम्मू-काश्मीर विधानसभा निवडणूक दोन मतदारसंघांमधून लढविली होती आणि त्यांना दोन्ही मतदारसंघांमध्ये पराभव पत्करावा लागला होता. तर स्वत:च्या टिप्पणीवरून वाद वाढला असता इल्तिजा यांनी स्पष्टीकरण देण्याचा प्रयत्न केला आहे. व्हिडिओत निष्पाप युवकांना मारहाण झाल्याचे पाहून संताप आला होता अशी सारवासारव करण्याचा प्रयत्न त्यांनी केला आहे.









