सरकारवर केला आरोप ः
वृत्तसंस्था/ श्रीनगर
जम्मू-काश्मीरच्या माजी मुख्यमंत्री आणि पीडीपी प्रमुख मेहबूबा मुफ्ती यांनी रविवारी ट्विट करत सरकारने आपल्याला स्थानबद्ध केल्याचा आरोप केला आहे. घराबाहेर तैनात सीआरपीएफ जवान आणि मुख्य प्रवेशद्वारावर लावण्यात आलेल्या टाळय़ाचे छायाचित्रही त्यांनी शेअर केले आहे. जम्मू-काश्मीर प्रशासनाकडून सुरक्षेचा दाखला देत मला स्थानबद्ध करण्यात आले आहे. परंतु प्रशासनाचे लोक स्वतः खोऱयातील कानाकोपऱयात हिंडत असल्याचे मुफ्ती यांनी म्हटले आहे.
केंद्र सरकार काश्मिरी पंडितांचे दुःख लपवू पाहत आहे. सरकारच्या निर्दयी धोरणांमुळेच काश्मिरी पंडितांना टार्गेट किलिंगला सामोरे जावे लागत आहे. परंतु सरकार सर्वांसमोर आम्हाला काश्मिरी पंडितांचे शत्रू म्हणून सादर करू पाहत आहे. याचमुळे मला स्थानबद्ध करण्यात आल्याचा दावा मुफ्ती यांनी ट्विटद्वारे केला आहे.
मेहबूबा मुफ्ती या रविवारी सुनील कुमार भट्ट यांच्या कुटुंबीयांची भेट घेणार होत्या. भट्ट यांची 16 ऑगस्ट रोजी दहशतवाद्यांनी हत्या केली होती. दक्षिण काश्मीरच्या शोपियांमध्ये दहशतवाद्यांनी सुनील आणि त्यांच्या भावावर हल्ला केला होता. यात सुनील यांचा मृत्यू झाला होता. या हल्ल्याची जबाबदारी अल बद्र या दहशतवादी संघटनेने स्वीकारली होती.
मेहबूबा यांनी 3 महिन्यांपूर्वी म्हणजेच 13 मे रोजी प्रशासनाने स्थानबद्ध केले होते. त्यावेळी त्या बडगामच्या दौऱयावर जाण्याच्या तयारीत होत्या. मेहबूबा त्यावेळी टार्गेट किलिंगमध्ये मारले गेलेले काश्मिरी पंडित राहुल भट्ट यांच्या कुटुंबीयांना भेटण्यासाठी जात होत्या.









