काश्मीरमधील अतिक्रमणविरोधी मोहिमेविरोधात दिल्लीत ठिय्या
नवी दिल्ली / वृत्तसंस्था
पीडीपी नेत्या मेहबुबा मुफ्ती यांना बुधवारी दिल्ली पोलिसांनी ताब्यात घेतले. जम्मू-काश्मीर प्रशासनाच्या अतिक्रमणविरोधी मोहिमेला विरोध करण्यासाठी त्यांनी दिल्लीत ठिय्या आंदोलन केले. यावेळी त्यांच्या कार्यकर्त्यांनाही ताब्यात घेण्यात आले आहे. जम्मू-काश्मीरमध्ये गुंडा राज सुरू असून अफगाणिस्तानप्रमाणे वातावरण बनत चालल्याचा दावा मुफ्ती यांनी केला. यासोबतच त्यांच्या कार्यकर्त्यांनी ‘भाजप हाय-हाय’च्या घोषणा दिल्या. जम्मू-काश्मीरमधील 20 जिल्हय़ांमध्ये अतिक्रमणविरोधी मोहीम राबविण्यात येत आहे. कथित सरकारी जमिनी मोकळय़ा करण्यासाठी आतापर्यंत अनेक इमारतींवर बुलडोझर चालवण्यात आला आहे. याबाबत स्थानिक लोकांची निदर्शनेही सुरू आहेत.
जम्मू काश्मीरमधील अतिक्रमणविरोधी कारवाईच्या मुद्दय़ावर पीडीपीने आवाज उठविण्यासाठी रेल्वे भवन ते संसदेपर्यंत मोर्चा काढण्याची योजना आखली होती. यादरम्यान, मेहबुबा मुफ्ती यांनी पत्रकारांशी संवाद साधताना राज्यातील जनतेचा आवाज दिल्लीपर्यंत पोहोचवण्यासाठी आपण येथे आल्याचे स्पष्ट केले. आम्ही विरोधी पक्षांना आणि सत्ताधारी भाजपला जम्मू-काश्मीरमधील लोकांचे दुःख सांगण्यासाठी आलो आहोत. आम्हाला संसदेपर्यंत दिले जात नसेल तर, आम्ही आमच्या तक्रारी संयुक्त राष्ट्रात सोडवाव्यात अशी सरकारची इच्छा आहे का? असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला. जम्मू-काश्मीरमध्ये कायद्याचे राज्य नाही. दिल्लीत आम्ही आमचे म्हणणे मांडण्यासाठी आलो होतो, पण इथेही सर्वसामान्यांचा आवाज दाबला गेल्याचे दिसतेय, असे त्या पुढे म्हणाल्या. अतिक्रमण हटाव मोहिमेमुळे काश्मीर पॅलेस्टाईनपेक्षाही वाईट स्थितीत बदलत आहे. केंद्रातील सरकारला आता जम्मू-काश्मीरला अफगाणिस्तानसारखे बनवायचे असल्याचा आरोप मुफ्ती यांनी केला.









