प्रतिनिधी /तिसवाडी
ओल्ड गोवा सरपंचपदी मेघश्याम पर्वतकर यांची बिनविरोध निवड झाली आहे. काल सोमवारी सकाळी झालेल्या या निवडणुकीसाठी पर्वतकर यांचा एकच अर्ज आला होता. निर्वाचन अधिकारी जेनू नाईक यांनी एकच अर्ज आल्याने पर्वतकर यांची निवड बिनविरोध झाल्याचे जाहीर केले.
मेघश्याम पर्वतकर हे प्रभाग क्र. 7 सदस्य आहेत. पंच विश्वास कुट्टीकर यांनी त्यांचे नाव सूचविले तर विशाल वळवईकर यांनी अनुमोदन दिले. पंच सदस्य नीळकंठ भोमकर, नम्रता भोमकर, जनिता मडकईकर, विश्वास कुट्टीकर, विशाल वळवईकर, प्रज्ञा फडते, तुळशीदास कवळेकर, अर्चिता पैंगीणकर या सर्वांनी पर्वतकर यांना पाठिंबा दिल्याने बिनविरोध निवड झाली.
निवड झाल्यानंतर सरपंच पर्वतकर यांनी पत्रकारांना सागितले की आपण सर्व पंच सदस्यांना विश्वासात घेऊन गावाचा विकास पुढे नेण्याचा प्रयत्न करणार आहे. सरकारने जर पंचायतींना काही काळ वाढवून दिला तर त्या काळात राहिलेली सर्व कामे पूर्ण करण्याचा प्रयत्न करण्यात येईल. ओल्ड गोवा परिसरात करण्यात आलेल्या बेकायदेशीर बांधकामासंदर्भात विचारले असता त्यांनी सांगितले की त्याबाबत पंचायतीने यापुर्वी जी भूमिका घेतली आहे, तीच पुढेही राहणार आहे.









