वृत्तसंस्था/ निंग्बो (चीन)
आयएसएसएफच्या 2025 सालातील झालेल्या शेवटच्या विश्वचषक रायफल-पिस्तुल नेमबाजी चॅम्पियनशिप स्पर्धेत भारताची महिला नेमबाज मेघना सज्जनारने पहिले पदक पटकाविले. 10 मी. एअर रायफल क्रीडा प्रकारात कांस्यपदक मिळविले. या स्पर्धेमध्ये भारत पदकतक्त्यात पाचव्या स्थानावर राहिला.
गेल्या आठ वर्षांच्या कालावधीत मेघनाने पहिल्यांदाच विश्वचषक नेमबाजी स्पर्धेत अंतिम फेरीपर्यंत मजल मारली होती. महिलांच्या 10 मी. एअर रायफल नेमबाजीत मेघनाने 230.0 गुण नोंदवित कांस्यपदक घेतले. या क्रीडा प्रकारात चीनची पेंग झिनलू हिने 255.3 गुणासह नवा विश्वविक्रम नोंदवित सुवर्णपदकाला गवसणी घातली. नॉर्वेच्या जेनेटी ड्यूस्टेडने रौप्यपदक मिळविले. यापूर्वी या क्रीडा प्रकारात चीनच्या वेंग झिफेईने 254.8 गुणांचा विश्वविक्रम केला होता. पण चीनच्या झिनलूने तो मोडीत काढला.
या स्पर्धेमध्ये ईशा सिंगने महिलांच्या 10 मी. एअर पिस्तुल नेमबाजीत भारताला पहिले सुवर्णपदक मिळवून दिले. या स्पर्धेच्या पदक तक्त्यात चीन 3 सुवर्णासह पहिल्या तर नॉर्वे 2 सुवर्णासह दुसऱ्या स्थानावर राहिले. पुरुषांच्या विभागात किरण जाधव 50 मी. रायफल थ्री पोझिशन क्रीडा प्रकारात पात्र फेरीत चौथ्या स्थानावर राहिला. मात्र त्याला अंतिम फेरीत 406.7 गुणासह आठव्या स्थानावर समाधान मानावे लागले. पॅरिस ऑलिम्पिक स्पर्धेत कांस्यपदक मिळविणारा स्वप्निल कुसाळेकडून पूर्ण निराशा झाली. स्वप्निलला पात्र फेरीमध्ये 21 व्या स्थानावर समाधान मानावे लागले. तर महिलांच्या एअर रायफल नेमबाजीत भारताची ऑलिम्पिक नेमबाज रमीता झिंदाल 22 व्या स्थानावर राहिली.









