मेघनासह मुलांची पाच तास तपासणी : बहुचीर्चित बाणस्तारी अपघात प्रकरण
मडगाव : बाणस्तारी येथील बहुचर्चित ‘डंक अँड ड्राईव्ह’ मर्सिडीज कार अपघातात तिघांचा मृत्यू झाला होता, तर तिघेजण गंभीर जखमी झाले होते. या कारची मालक मेघना सावर्डेकर ही काल मंगळवारी आपला रुबाब दाखवत चक्क बाऊन्सर घेऊन इस्पितळात तपासणीसाठी आली. मात्र तेथील डॉक्टरांनी या प्रकाराला आक्षेप घेऊन तिला दणका दिला. मेघना सावर्डेकर व तिच्या तिन्ही मुलांची काल मंगळवारी दक्षिण गोवा जिल्हा इस्पितळात वैद्यकीय तपासणी करण्यात आली. ही वैद्यकीय तपासणी सुमारे सहा तास चालली. गेले काही दिवस मेघना सावर्डेकर या तपासकामात सहकार्य करीत नसल्याचा आरोप झाला होता. मात्र, हे प्रकरण क्राईम ब्रँचकडे सुपूर्द केल्यानंतर मेघना सावर्डेकर व तिच्या एका मुलाची जबानी फोंडा न्यायालयात नोंद करून घेण्यात आली. काल मंगळवारी दक्षिण गोवा जिल्हा इस्पितळात वैद्यकीय तपासणी करण्यात आली. विशेष म्हणजे या वैद्यकीय तपासणीच्यावेळी छायाचित्रण करण्यात आले. हे छायाचित्रण पोलिसांच्या न्यायवैद्यक विभागाने केले. या अपघातात पोलिसांच्याच एका छायाचित्रकाराच्या आई-वडिलांचा बळी गेला होता.
बाऊन्सरना डॉक्टरांचा आक्षेप
वैद्यकीय तपासणीसाठी येताना मेघना व तिची तिन्ही मुले ‘बाऊन्सर’चे संरक्षण घेऊन आली होती. तपासणी केंद्राच्या बाहेर ‘बाऊन्सर’ आल्याने त्यांना ड्युटीवरील डॉक्टरांनी आक्षेप घेतला. त्यांमुळे या बाऊन्सरना काढता पाय घ्यावा लागला. अपघातात मेघना व तिन्ही मुलांना काही जखमा झाल्या आहेत काय, याची तपासणी काल करण्यात आली. गेले काही दिवस मेघना तपासकामात सहकार्य करीत नसल्याने तिची पोलीस जबानी व वैद्यकीय तपासणी लांबणीवर पडली होती.
मुलांना शाळेत पाठविलेच नाही…
बाणस्तारी अपघातानंतर मेघना व परेश सावर्डेकर यांनी आपल्या तिन्ही मुलांना शाळेत पाठविलेच नाही. काल वैद्यकीय तपासणीच्यावेळी हा प्रकार उघडकीस आला. मुलांना शाळेत पाठविण्याचा सल्लाही काल डॉक्टरांनी दिला.









