पावसाचं गणित काय आणि गाणं काय ते कधी कुणाला कळलंय? पडतो तेव्हा असा पडतो की उमड घुमड घन गरजे कारे कारे बदरा डराए घनन घनन घन बरसे अशी अवस्था असते. आणि जेव्हा पाऊस ओढ देतो, दूर जातो, फसवतो तेव्हा डोळ्यातलं पाणीसुद्धा आटून जावं असा नाहिसा होतो आणि मग तहानल्या शिवाराला
आसुसली माती पिकवाया मोती आभाळाच्या हत्ती आता पाऊस पाड गा पाऊस पाड
म्हणून दोन हात वर करून हंबरडा फोडावा लागतो. तरीही तो निघूनच जातो. येता येत नाही. पाऊस हा मल्हार असतो. मलाचं हरण करणारा. म्हणूनच की काय पण पावसाला समर्पित असलेल्या मल्हाराचे मेघमल्हार, मियामल्हार, मधुमल्हार, जयंतीमल्हार, रामदासी मल्हार असे अनेक प्रकार आहेत. पंडित कुमार गंधर्व ते पंडित सी.आर. व्यास, उस्ताद बिस्मिल्ला खाँ साहेब आणि इतर असंख्य कीर्तिमान गायक वादक कलाकारांनी मल्हाराचे हे प्रकार प्रकाशमान करून ठेवले आहेत. अगदी भर उन्हाळ्यातही ते चिंब भिजवून सोडतात आपल्याला. घनसी घना घन गरजे, बरखा रितु आयी, सावन की रुत आयी रे सजनिया आणि अनेक अनेक चिजा…न संपणारी यादी आहे ही, सावन की बूँदनियाँसारख्या बंदिशी तर मल्हारात बांधलेल्या नसूनही पाऊस आणतात. आणि पं. भीमसेन जोशींसारखा सिद्ध गायक असेल तर अक्षरश: मोसम नसतानाही पाऊस धोधो बरसून गाण्याला दाद देतो. पाऊस सगळीकडे सारखा बरसत नाही. कधी टपटप, कधी सरसर, कधी धोधो तर कधी रिमझिम.
रिमझिम पाऊस पडे सारखा
यमुनेलाही पुर चढे
पाणीच पाणी चहूकडे गं बाई
गेला मोहन कुणीकडे
सारखं गीत रिमझिम पावसाने माजवलेला उत्पात दर्शवतं. तर
झिमझिम झरती श्रावणधारा
धरतीच्या कलशात
प्रियाविण उदास वाटे रात
सारखं मधुकर जोशींचं गीत सहज म्हणून जरी कानावर पडलं तरी असह्य उदासी आणि हुरहूर दाटून येते. पावसाचं हे गाणं सुमनताईंनी असं गायलंय की भल्यामोठ्या प्रासादातली ती एकाकी विरहिणी, चोहीकडे गच्च दाटलेला काळोख, तशीच एकाकी असणारी एखादीच समई आणि काळोखातच पावसासारखेच झरणारे ते सारंग, सरस्वतीचे सूर हे सगळं चित्र डोळ्यांसमोर उभं करतं ते गाणं!
आषाढाच्या पावसात दर्द असतो हे तेव्हाच कळतं जेव्हा
रंध्रात पेरिली मी आषाढदर्द गाणी
उन्मादल्या सरींची उमजून घे कहाणी
या ओळी भरपावसात कानावर पडतात. ठोम पाऊस कोसळत असताना खरोखरच सगळी दारे बंद असताना आयुष्यात प्रश्नावर प्रश्न पडलेला प्रवासी भिजत भिजत चालत जावा तसं वाटतं. पाऊस असाही असतो का? तो एवढा उदासवाणा का भासतो?
ती गेली तेव्हा रिमझिम पाऊस निनादत होता
मेघात अडकली किरणे हा सूर्य सोडवित होता
ग्रेसांची कविता आपल्याला फिरव फिरव फिरवते. खिडकीवरचा धुरकट कंदील एकटाच जळत असतो आणि अंगणातून तो मृतदेह जाताना डोक्यावर पडणारा पाऊस बालपण वाहून घेऊन जातो. पण
पावसाची रिमझिम थांबली रे
तुझी माझी जोडी जमली रे
आभाळात छान छान सात रंगी कमान
कमानीखाली त्या नाच.
असं सोबत नाचायला मोरपंखी सोबती मिळतो तोही भरपावसातच
सांग सांग भोलानाथ पाऊस पडेल काय
शाळेभोवती तळे साचून सुट्टी मिळेल काय?
असं अजूनही मुलांना विचारावंसं वाटतं. मंगेश पाडगांवकरांनी विचारलेला हा प्रश्न फारच मिश्किल आहे. पण खरं म्हणजे हल्ली ज्या त्या शाळांभोवती अनधिकृत बांधकामांचे ग्रहण इतकं लागलं आहे की अख्ख्या पावसाळ्यात शाळांना बुडायचीच वेळ येते.
पावसाच्या गाण्यांचा मिलिंद इंगळेंचा आजही आवडीने ऐकला जाणारा अल्बम म्हणजे ‘गारवा’. यातली सगळीच गाणी लोकप्रिय आहेत.
रिमझिम धून आभाळ भरून
हरवले मन येणार हे कोण?
किंवा
गार वारा हा भरारा नभ टिपूस टिपूस
रानीवनी पानोपानी मन पाऊस पाऊस
यासारखी आठ गाणी अतिशय लोकप्रिय पाऊसगाणी ठरली. त्यासोबतच पाठोपाठ आलेला ‘सांज गारवा’ हाही अल्बम तुफान गाजला.
भेट माझी तुझी सांजवेळी घडे
आता उरी या अंबरी चांदण्याचे सडे.
ते खुद्द टायटल असलेलं ‘सांज गारवा’ केवळ लाजवाब! पाऊस हा असाही असतो बरं.
हो झुंजूर-मुंजूर पाऊस माऱ्यानं
अंग माझं ओलंचिंब झालं रं हा?
हो टिपूर-टिपूर पाण्याची घुंगरं
हिरव्या-हिरव्या धरेवरी आली रं…
आशाताईंच्या स्वरातलं मधु कांबीकर यांच्यावर चित्रित झालेलं हे हिरवंगार पाऊसगाणं म्हणजे पावसासोबत मादकपणाचंही दर्शन घडवतं. तर चश्मेबद्दूर मधलं दीप्ती नवल यांच्या तोंडी असलेलं पूर्णपणे शास्त्राrय संगीतावर आधारित असलेलं
कहाँसे आये बदरा
घुलता जाये कजरा
आठवावं. येसुदासचा धीरगंभीर स्वर, हेमंती शुक्लांची तितकीच सुंदर साथ आणि गाण्यातला पाऊस ऐकता ऐकता, ‘रोये मन है पगला’ असं होऊन जातं. पण खरा खरा पाऊस ऐकायला मिळतो तो मात्र
मेघा रे मेघा रे मत परदेस जा रे
आज तू प्रेम का संदेस बरसा रे
या गीतातून लतादीदी आणि सुरेशजी काळजाला भिडणाऱ्या स्वरात गात राहतात आणि ‘प्यासा सावन’ अखंड बरसत राहतो. साऱ्या जगाची तहान भागवणाऱ्या पावसाला तहान लागत नसेल का? लागली तर त्याने कसं कुणाकडे जावं? मेघा रे मेघा रे…
-अॅड. अपर्णा परांजपे-प्रभु








