
क्रीडा प्रतिनिधी /बेळगाव
कॅन्सरपीडित मेघ व मयुरा या दोघांनी आयर्नमॅन स्पर्धेस पात्र ठरले असून अमेरिकेतील कोना येथे होणाऱया विश्व ट्रायथलॉन स्पर्धेसाठी त्यांची निवड झाली आहे. या स्पर्धेत पात्र ठरणारे मेघ व मयुरा (मुलगा व आई) हे पहिले भारतीय आहेत.
मेघ याने 11ः48.55 तासात ही स्पर्धा पूर्ण करून 18 ते 24 वयोगटात पहिले स्थान मिळविले. मेघ हा कॅन्सरपीडित असून, केमो व रेडिएशन थेरपी घेत त्याने ही स्पर्धा पूर्ण केली. मेघ उच्च शिक्षणासाठी बेस्टॉन येथील नॉर्थ इस्टर्न युनिव्हर्सिटीमध्ये जाणार आहे.
मयुरा ही आयर्नमॅन स्पर्धा 15ः18.06 तासात पूर्ण करणारी पहिली कॅन्सरपीडित महिला आहे. तीही कोना येथे होणाऱया विश्व ट्रायथलॉन स्पर्धेसाठी पात्र ठरली आहे. पण व्हिसामुळे त्यांचे जाणे रद्द झाले आहे. मात्र त्यांनी कॅन्सरपीडितांसाठी ग्रामीण भागातील रूग्णांकरिता पैसे जमा करून बेळगाव कॅन्सर हॉस्पिटलला मदत केली आहे.
आयर्नमॅन ट्रायथलॉन स्पर्धा लांब पल्ल्याची असते. त्यामध्ये 2.4 मैल (3.86 कि. मी.), पोहणे 2.10 वेळेत, 112 मैल (180.25 कि. मी.) सायकलिंग 6.20 वेळेत पूर्ण करणे, जलतरण व सायकलिंग 10.30 वेळेत व 26.22 मैल (42.20 कि. मी.) मॅरेथॉन असे या स्पर्धेचे स्वरूप आहे. न थांबता ही स्पर्धा निर्धारित वेळेत पूर्ण करणे गरजेचे असते. आई व मुलगा स्पर्धा पूर्ण करणारे पहिले भारतीय असून, 14 ऑगस्ट रोजी कझाकस्तान येथे ही स्पर्धा घेण्यात आली.









