रत्नागिरी :
विधानसभा निवडणुकातील अभूतपूर्व यशानंतर प्रथमच उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे महाराष्ट्रातील जनतेचे आभार यात्रेच्या निमित्ताने शनिवारी रत्नागिरीत येत आहेत. चंपक मैदान येथे दुपारी 12 वाजता होणाऱ्या या मेळाव्याच्या निमित्ताने उद्योगमंत्री उदय सामंत आणि त्यांचे बंधू आमदार किरण सामंत जोरदार शक्तीप्रदर्शन करणार असून जिह्यातील उबाठाचे व अन्य पक्षातील अनेक पदाधिकारी, कार्यकर्त्यांचा शिवसेनेत मेगा प्रवेश होणार आहे.
राज्यामध्ये महायुतीला मोठे यश विधानसभेला मिळाल्यानंतर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी जनतेचे आभार मानण्यासाठी आभार यात्रेला प्रारंभ केला आहे. रत्नागिरीत आज 15 फेब्रुवारी रोजी दुपारी 12 वाजता चंपक मैदान येथे आभार मेळावा होणार आहे. यानिमित्ताने होणाऱ्या जोरदार शक्तीप्रदर्शनासाठी मंत्री उदय सामंत, मंत्री योगेश कदम यांची प्रमुख उपस्थिती लाभणार आहे. तसेच आमदार किरण सामंत हे देखील उपस्थित राहणार आहेत.
या आभार मेळाव्यानिमित्ताने जवळपास 50 हजारपेक्षा अधिक शिवसैनिक उपस्थित राहण्याची शक्यता आहे. त्यासाठी मंडणगडपासून राजापूरच्या टोकापर्यंत प्रत्येक जिल्हा परिषद गट, नगर परिषद यामधून प्रत्येकी 1 हजार कार्यकर्ते यावेत, असे नियोजन झाले आहे. प्रत्येक प्रमुख पदाधिकाऱ्यांनी त्यासाठी कंबर कसली आहे. या मेळाव्यातच मंत्री उदय सामंत हे उबाठाला सुऊंग लावणार आहेत. यामध्ये अनेक प्रमुख पदाधिकारी शिवसेनेत प्रवेश करणार आहेत. संगमेश्वरचे माजी आमदार सुभाष बने, जि.प. माजी अध्यक्ष रोहन बने, राजापूरचे माजी आमदार गणपत कदम यांच्यासह अनेक प्रमुख पदाधिकारी शिवसेनेचा धनुष्यबाण हाती घेणार आहेत. त्यामुळे या मेळाव्याकडे राजकीय वर्तुळाचे विशेष लक्ष वेधले आहे.
- राजन साळवींनंतर आता सुभाष बने
गुरुवारी ठाणे येथे माजी आमदार राजन साळवी यांचा शिवसेनेत प्रवेश झाला. त्यानंतर आज चंपक मैदान येथे मोठा पक्षप्रवेश होणार आहे. एकंदरीत सुभाष बने यांचा पक्षप्रवेश हा उबाठा गटाला मोठा धक्का राहणार आहे. कारण जि. प. अध्यक्ष व त्यानंतर आमदार राहिलेले सुभाष बने यांचे मोठे प्रस्थ संगमेश्वर–देवरुख मतदारसंघात आहे. त्यांनी कार्यकर्त्यांची एक वेगळी फळी तयार केली आहे. त्यांच्यासोबत उबाठाचे दोन जि. प. सदस्य, 5 पंचायत समिती सदस्य, 15 शाखाप्रमुख, विभागप्रमुख, अन्य पदाधिकारी अशी मोठी फळी आहे. त्याचबरोबर संगमेश्वरसह देवरुख, खाडीपट्टा, दाभोळे विभागात बनेंचे वर्चस्व आहे. त्यामुळे हा पक्षप्रवेश ठाकरे शिवसेनेला जोरदार धक्का देणारा ठरणार आहे.
- रणनिती ज्याला कळली तो जिंकतो अन् नाही कळली तर पडतो
माजी आमदार राजन साळवी यांनी ‘सामंतांनी विनायक राऊतांना आणि राऊतांनी सामंतांना निवडणुकीत मदत केल्याचे’ वक्तव्य केले होते. त्यावर मंत्री उदय सामंत यांनी म्हटले की, राजकारणामध्ये कोणी कोणाला मदत केली, हा राजकीय रणनितीचा भाग आहे. ही रणनिती ज्यांना कळली तो जिंकतो, ज्याला नाही कळली तो पडतो. त्यामुळे राजकारणातल्या सर्व रणनिती सांगायला लागलो तर त्याला काही अर्थ नाही. यालाच राजकारण म्हणतात, असेही त्यांनी सांगितले.








