दोन वाहनांतील अपघातामुळे झाली कोंडी : विद्यार्थी, शिक्षक, कर्मचारी, रुग्णही अडकले,उत्तर गोव्यातून जाणाऱया हवाई प्रवाशांना फटका
प्रतिनिधी /वास्को
कुठ्ठाळीतील झुआरी पुलावर काल सोमवारी सकाळी दोन वाहनांमध्ये अपघात झाल्याने मोठय़ा प्रमाणात वाहतूक कोंडी झाली. दोन्ही वाहने हटवून पोलिसांनी तासाभरात रस्ता मोकळा केला. परंतु तीन तासांहून अधिक वेळ वाहने कोंडीत अडकून पडली. त्यामुळे दाबोळी विमानतळाकडे जाणारे हवाई प्रवासीही अडचणीत सापडले.
सध्या गोव्यात पर्यटन तेजीत असल्याने वाहतूक मोठय़ा प्रमाणात वाढलेली आहे. नोव्हेंबर डिसेंबर महिन्यातील अधिक वाहतूक वर्दीळीमुळे झुआरी पुलावर चक्का जाम होण्याच्या घटना जास्त प्रमाणात घडत असतात.
पर्यटनामुळे वाहनांच्या संख्येत वाढ
आठ दिवसांपूर्वीच मोठय़ा प्रमाणात या पुलावर कोंडी होऊन वाहनचालकांना काही तास तिष्ठत राहावे लागले होते. पुलावर झालेला अपघात याला कारण ठरला होता. काल सोमवारीसुध्दा या पुलावर टेम्पो ट्रव्हलर आणि पर्यटक टॅक्सी यांच्यामध्ये समोरासमोर टक्कर झाली. त्यामुळे सकाळी सकाळीच या पुलावर चक्का जाम झाला.
तब्बल तीन किलोमीटरपर्यंतच्या रांगा
पुलावरील अपघात सकाळी पावणे सातच्या सुमारास झाला. सकाळी सकाळीच पोलिसांना ती अपघातग्रस्त वाहने हटवण्यासाठी धावपळ करावी लागली. क्रेनच्या साहाय्याने ती हटवण्यात आली. तासाभरात रस्ता मोकळा झाला. परंतु अपघाताच्या पहिल्या पंधरा मिनिटांतच कुठ्ठाळी, वेर्णा व वाकोच्या दिशेने तसेच आगशीच्या दिशेने वाहनांच्या तीन किलो मिटर लांबपर्यंत रांगा लागल्या. हळुहळु वाहतूक कोंडीत वाढ झाल्याने तीन तासांहून अधिक वेळ वाहन चालकांना पुढे जाण्यासाठी तिष्ठत राहावे लागले.
अनेकांना चुकली नियोजित विमाने
सकाळची वेळ असल्याने विद्यार्थी, कर्मचारी, गोमेकॉमध्ये उपचारासाठी जाणारे व इतर प्रवासी अडकून पडले. उत्तर गोव्यातून हवाई उड्डाणासाठी दाबोळी विमानतळाकडे येणाऱया प्रवाशांनाही या वाहतूक कोंडीचा फटका बसला. अनेकांना विमाने चुकल्याच्या तक्रारी आल्या.
एका तासात वाहने हटली तरी, कोंडी सुरुच
सकाळी आठ, नऊ, दहा ते अकरा वाजेपर्यंत वाहतुकीत सतत भर पडत होती. रस्ता मोकळा झाला तरी कोंडी सुटत नव्हती. त्यात काही वाहनचालक बेशिस्तपणे पुढे जाण्याच्या प्रयत्नात वाहतूक कोंडीत भर घालू लागल्याने ही समस्या सुटायला अधिक वेळ लागला. दुपारी बाराच्या सुमारास या महामार्गावरील वाहतूक थोडी फार सुरळीत झाली.
सरकारच्या निष्काळजीपणामुळे कुठ्ठाळीत वाहतूक कोंडी

विरोधी पक्षनेते युरी आलेमाव यांची जोरदार टीका
रस्त्यांवर उभे केलेल्या अनावश्यक बॅरिकेड्समुळे वाहनांची होणारी संथ गती, वाहतूक व्यवस्थापनाबाबत अनभिज्ञ असलेल्या पोलिस कर्मचाऱयांची कुठ्ठाळी जंक्शनवर तैनाती आणि दिशादर्शक चिन्हांचा अभाव यामुळे कुठ्ठाळी येथे मोठय़ा प्रमाणात वाहतूक कोंडी होत आहे. सरकारच्या दुर्लक्षामुळे ही मानवनिर्मित वाहतूक कोंडी झाली आहे असे विरोधी पक्षनेते युरी आलेमाव यांनी म्हटले आहे.
कुठ्ठाळी येथे झालेल्या वाहतूक कोंडीचे तीन व्हिडिओ जारी करून, युरी आलेमाव यांनी सावळय़ा गोंधळाने वाहतूक कोंडीचा उडालेला बोजवारा उघड केला आहे. विरोधी पक्षनेत्यांनी जारी केलेल्या व्हिडिओमध्ये कुठ्ठाळी जंक्शनवरील वाहतुकीचे संपूर्ण गैरव्यवस्थापन दिसून येते. तेथे तैनात असलेल्या वाहतूक पोलिसांना योग्य प्रशिक्षण देण्याची गरज आहे. कुठ्ठाळीच्या बाजूने जुवारी पुलावर जाणाऱया मार्गावरील रेल्वे ट्रकच्या खाली रहदारीवर देखरेख ठेवण्यासाठी होमगार्डना जबाबदारी देणे हे धक्कादायक आहे, असे युरी आलेमाव यांनी म्हटले आहे.
लेनचे सीमांकन आवश्यक
सणासुदीमुळे मडगाव-पणजी मार्गावर वाहनांची वर्दळ मोठय़ा प्रमाणात वाढणार असल्याने, पणजी आणि मडगावकडून येणाऱया व वास्कोकडे जाणाऱया वाहनांसाठी कुठ्ठाळी जंक्शनच्या आधी 500 मीटर अंतरावर लेनचे सीमांकन करण्यात यावे, अशी माझी मागणी आहे. सदर लेनचे सीमांकन केल्याने वाहन चालकांकडून अचानक लेन बदलणे थांबेल आणि रहदारी सुरळीत होण्यास मदत होईल असे युरी आलेमाव म्हणाले.
अनावश्यक बॅरिकेड्स हटवावे
वाहतुकीच्या हालचालींवर लक्ष ठेवण्यासाठी सरकारने प्रशिक्षित वाहतूक पोलीस कर्मचारी तैनात केले पाहिजेत. केसरवाळ ते कुठ्ठाळी जंक्शनपर्यंत विविध ठिकाणी लावलेले अनावश्यक बॅरिकेड्स काढून टाकले पाहिजेत आणि वास्को, पणजी आणि मडगावला जाणाऱया वाहनांच्या लेनचे सीमांकन करून योग्य दीशादर्शक फलक लावले पाहिजेत, असे युरी आलेमाव म्हणाले.
मुले उशिरा शाळेत पोचली
नेहमीच्याच झालेल्या वाहतूक कोंडीत रुग्णाला घेऊन जाणारी रुग्णवाहिका अडकल्यास रुग्णाचा जीव जाऊ शकतो. आज अनेक शाळकरी मुले त्यांच्या शाळेत वेळेवर पोहोचू शकली नाहीत. कार्यालयीन कर्मचाऱयांना वेळेत कामावर पोचणे अवघड होते. वाहतूक मंत्री मॉविन गुदीन्हो हे प्रवाशांना भेडसावणाऱया वाहतुकीच्या त्रासाचा अंत करण्यासाठी संबंधित अधिकाऱयांना आवश्यक निर्देश देतील अशी आशा आपण बाळगतो असे युरी आलेमाव म्हणाले.









