वृत्तसंस्था/ मेलबोर्न
2027 साली होणाऱ्या आयसीसीच्या 19 वर्षाखालील वयोगटातील महिलांच्या टी-20 विश्वचषक क्रिकेट स्पर्धेसाठी क्रिकेट ऑस्ट्रेलियाने आतापासूनच काही महत्त्वाचे निर्णय घेण्याचे सत्र सुरु केले आहे. दरम्यान ऑस्टेलिया महिला संघाची माजी कर्णधार मेग लेनिंग हिचा प्रशिक्षक वर्गामध्ये समावेश करण्याचा निर्णय घेतला आहे. ऑस्ट्रेलियाने या स्पर्धेसाठी 26 सदस्यांचा संभाव्य संघ निवडला असून त्यांचा आता प्रशिक्षण सराव सुरु होणार आहे.
ऑस्ट्रेलियन महिला क्रिकेट संघाने यापूर्वी जागतीक क्रिकेटमध्ये आपले निर्विवाद वर्चस्व राखताना 7 वेळेला महिलांची विश्वचषक क्रिकेट स्पर्धा मेग लेनिंगच्या नेतृत्वाखाली जिंकली आहे. ब्रिसबेनच्या राष्ट्रीय क्रिकेट अकादमीमध्ये संभाव्य संघातील खेळाडूंच्या सराव प्रशिक्षण शिबिराला प्रारंभ केला जाणार असून या शिबिरात मेग लेनिंग तसेच अन्य प्रशिक्षकांचे मार्गदर्शन लाभणार आहे. 2023 आणि 2025 साली झालेल्या आयसीसीच्या महिलांच्या 19 वर्षाखालील टी-20 विश्वचषक क्रिकेट स्पर्धेत ऑस्ट्रेलियन महिला संघाला उपांत्य फेरीपर्यंत मजल मारता आली होती.









