बेळगाव : बेळगाव येथील कायदा व सुव्यवस्था परिस्थिती राखण्यासाठी पोलीस अधिकाऱ्यांनी सबबिटनिहाय बैठकांवर भर दिला आहे. रविवारी टिळकवाडी पोलीस स्थानकाच्या कार्यक्षेत्रातील अनेक ठिकाणी नागरिकांच्या बैठका घेऊन त्यांना वेगवेगळ्या विषयांवर माहिती देण्यात आली. टिळकवाडीचे पोलीस निरीक्षक परशुराम पुजेरी व त्यांच्या सहकाऱ्यांनी इंद्रप्रस्थनगर, साईश्रद्धा कॉलनी, आनंदवाडी व बुधवार पेठ, टिळकवाडी येथील नागरिकांची बैठक घेऊन त्यांना मार्गदर्शन केले. गेल्या अनेक वर्षांपासून सबबिटची व्यवस्था अस्तित्वात आहे. प्रत्येक बिटसाठी एका पोलिसाची नियुक्ती केलेली असते. रमजान, गुढीपाडव्याच्या पार्श्वभूमीवर संपूर्ण शहरात बैठका वाढविण्यात आल्या आहेत.
गेल्या पंधरवड्यातील अप्रिय घटनांची मालिका लक्षात घेऊन सबबिट बैठकीत अधिकारी मार्गदर्शन करीत आहेत. खासकरून सोशल मीडियावर आक्षेपार्ह पोस्ट करू नये, कोणी केल्यास ते इतरांना पाठवू नये, प्रत्येकाने वाहतुकीचे नियम पाळावेत, सायबर गुन्हेगारांपासून सावध रहावे, असे आवाहन पोलीस निरीक्षक परशुराम पुजेरी यांनी केले. सायबर गुन्हेगारीविषयक जागृतीबरोबरच अमलीपदार्थांची विक्री व सेवनाविरुद्धही अशा बैठकातून अधिकारी जागृती करीत आहेत. अमलीपदार्थांची विक्री करणाऱ्यांविषयी नागरिकांनी माहिती द्यावी. तरुणाईला व्यसनाधीनतेपासून वाचविण्यासाठी ही माहिती उपयुक्त ठरणार आहे. त्यामुळे तरुणाईला व्यसनाधीन बनवणाऱ्या नशेचे साहित्य विकणाऱ्यांबद्दल माहिती देण्याचे आवाहन करण्यात आले.









