पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अमेरिका दौऱ्यावर प्रथमच जयशंकर झाले व्यक्त, संबंध दृढ होणार
वृत्तसंस्था / नवी दिल्ली
भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रंप यांची भेट अतिशय सकारात्मक पद्धतीने पार पडली आहे, असे प्रतिपादन परराष्ट्र व्यवहार मंत्री एस. जयशंकर यांनी केले आहे. त्यांनी प्रथमच या भेटीवर आपले विचार विस्ताराने व्यक्त केले. ते दिल्ली विद्यापीठाच्या ‘साहित्य उत्सव’ या कार्यक्रमात भाषण करीत होते. या भेटीमुळे दोन्ही देश एकमेकांच्या अधिकच जवळ येण्याचा मार्ग मोकळा झाला आहे, अशी प्रतिक्रिया त्यांनी शनिवारी व्यक्त केली.
पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अध्यक्ष डोनाल्ड ट्रंप यांनी एकमेकांच्या त्यांच्या देशाप्रती असणाऱ्या भावना समजून घेतल्या आहेत, हे या भेटीचे मोठे फलित आहेत. ही भेट अत्यंत सौहार्दपूर्ण वातावरणात आणि मोकळेपणाने झाली. डोनाल्ड ट्रंप यांनी अध्यक्षपदाची शपथ घेतल्यानंतर त्यांनी भेटीसाठी आमंत्रित केलेल्या पहिल्या काही नेत्यांपैकी एक पंतप्रधान नरेंद्र मोदी होते. यावरुन ते भारताला किती महत्व देतात ही बाब स्पष्ट झाली. दोन्ही नेत्यांची व्हाईट हाऊसमधील भेट सफल झाली, हे मी माझ्या अनुभवावरुन स्पष्ट करु शकतो. अनेक कारणांसाठी ही भेट महत्वाची होती, असे उद्गार त्यांनी काढले.
बळकट राष्ट्रवाद भावला
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा बळकट राष्ट्रवाद अध्यक्ष डोनाल्ड ट्रंप यांना भावला आहे. त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भारताविषयीची निष्ठा आणि त्यांचा आत्मविश्वास यांची प्रशंसा केली आहे. ते एक प्रखर राष्ट्रवादी आहेत आणि त्यांच्या प्रत्येक कृतीतून त्यांची ही भावना प्रगट होते, असे उद्गार ट्रंप यांनी काढले आहेत. अध्यक्ष डोनाल्ड ट्रंप हे स्वत: प्रखर अमेरिकन राष्ट्रवादी नेते आहेत. त्यामुळे हे दोन्ही नेते एकमेकांच्या भावना जाणतात आणि त्यांचा आदर करतात. आंतरराष्ट्रीय संबंध दृढ करण्यासाठी या आदराची आवश्यकता असते. ती या भेटीतून पदोपदी दृगोचर झाली, असे प्रतिपादन जयशंकर यांनी केले.
देशहितालाच प्राधान्य
पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि डोनाल्ड ट्रंप हे दोन्ही नेते देशहिताला प्राधान्य देणारेच आहेत आणि एकमेकांसंबंधीच्या या समान भावना त्यांची जाणल्या आहेत. त्यांच्यामधील ‘केमिस्ट्री’ उत्तम आहे. दोन्ही नेते सकारात्मक विचारसरणीचे आहेत. आधुनिकतेची त्यांना आस आहे. त्यांच्यातील डायनॅमिक्स सकारात्मक आहे. ट्रंप यांची कार्यपद्धती किंवा विचार हे नेहमीपेक्षा भिन्न आहेत. जगातील अनेक इतर नेत्यांशी त्यांचे पटतेच असे नाही. तथापि, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशी मात्र त्यांचे चांगले जुळते, अशी आपली भावना असल्याचे जयशंकर यांनी सपष्ट केले.
भारताचे परराष्ट्र धोरण काय ?
भारताचे परराष्ट्र धोरणही जयशंकर यांनी आपल्या भाषणात स्पष्ट केले. यासाठी त्यांनी रामायणातील प्रसंग उधृत केला. भगवान हनुमान लंकेला चर्चा करुन सामोपाचाराने समस्या मिटविण्यासाठी गेले होते. संबंध दृढ करणे आणि सहकार्याची भावना वाढविणे हा त्यांचा उद्देश होता. भारताचे विदेश व्यवहार धोरणही अशाच प्रकारचे आहे. आम्हाला कोणाशीही स्पर्धा करायची नाही. किंवा कोणालाही दुखवायचेही नाही. तथापि, आपल्या देशाचे कल्याण आणि प्रगती करण्यासाठी परराष्ट्र धोरण कसे उपयोगी पडेल हे आम्ही पहात असतो. विशेषत: भारतासंबंधी आक्रमक भूमिका घेणारे आणि भांडखोर असणारे शेजारी देश आम्हाला हाताळावे लागतात. त्यांच्याशीही सौहार्दपूर्ण संबंध असावेत अशी आमची इच्छा आणि कृती असते. जास्तीत जास्त देशांशी मैत्री करणे, हे आमचे ध्येय आहे. संघर्षापेक्षा सामोपचार हे आमच्या धोरणाचे सूत्र आहे. आम्हाला प्रतिसादही चांगला मिळत आहे, हे त्यांनी भाषणात आवर्जून नमूद केले आहे.
उज्ज्वल भवितव्याची आशा
ड अमेरिकेची भारताचे संबंध अधिक दृढ होतील, या शक्यतेला मोठे बळ
ड पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि डोनाल्ड ट्रंप एकमेकांच्या भावना जाणतात
ड दोन्ही नेत्यांमधील केमिस्ट्री दृढ, संबंध अधिक भक्कम निश्चित होणार
ड संरक्षण, आर्थिक क्षेत्र, तंत्रज्ञान आदानप्रदान हे होते चर्चेचे प्रमुख विषय









