बेळगाव : अखिल भारतीय मराठी साहित्य परिषद व मराठा मंदिर बेळगाव आयोजित चौथे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन रविवार दि. 5 मार्च रोजी छत्रपती शिवाजी महाराज संमेलननगरी, मराठा मंदिर येथे होणार आहे. संमेलनाध्यक्षा म्हणून साहित्यिका डॉ. अरुणा ढेरे उपस्थित राहणार आहेत. सकाळी 10 ते 12 यावेळेत मराठा मंदिरचे चेअरमन व उद्योजक आप्पासाहेब गुरव यांच्या हस्ते उद्घाटन होणार असून, यावेळी परिषदेचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद गोरे आणि राज्याध्यक्ष रविंद्र पाटील उपस्थित राहणार आहेत. उद्घाटनानंतर 12 ते 1 यावेळेत डॉ. ढेरे यांचे भाषण होईल. दुसऱ्या सत्रात आप्पासाहेब खोत यांचे कथाकथन होईल. 2 ते 3 यावेळेत स्नेहभोजन, 3 ते 4 यावेळेत कवी संमेलन व चौथ्या सत्रात हास्यसम्राट संभाजी यादव यांचा हास्य दरबार विनोदी कार्यक्रम होईल.
संमेलनाध्यक्षांचा परिचय मराठीतील नामवंत लेखिका-अरुणा ढेरे
मराठीतील एक नामवंत लेखिका अरुणा ढेरे यांनी ‘स्वातंत्र्योत्तर मराठी कथा-कादंबऱ्यांचा आधी बंधात्मक अभ्यास’ या विषयावर पीएचडी केली आहे. पुणे विद्यापीठाच्या शैक्षणिक माध्यम संशोधन केंद्रात अध्यापक म्हणून तसेच भारतीय शिक्षण शास्त्र संस्थेत साहित्य विभाग प्रमुख म्हणून त्यांनी काम केले. ‘पसाय मासिकाचे संपादक पद त्यांनी सांभाळले. भारतीय विद्यापीठाच्या स्त्राr सर्जन शक्ती विकास केंद्राच्या संचालक म्हणून कार्यरत आहेत. सहा कविता संग्रह, तीन कादंबऱ्या, सहा कथा संग्रह या शिवाय ललित सांस्कृतिक लेख संग्रह त्यांच्या नावावर जमा आहेत. या शिवाय अनेक पुस्तकांचे संपादन केले आहे. दूरचित्रवाणीसाठी ‘सांजसावल्या’ या मालिकेचे पटकथा व संवादन केले आहे.विपुल लेखन करणाऱ्या अरुणा ढेरे यांना त्यांच्या साहित्यकृतीसाठी 45 हून अधिक पुरस्कार मिळाले आहेत.
प्रबोधनकार-संभाजी भगत
अंधश्रद्धा निर्मूलन, व्यसनमुक्ती, स्त्राrभ्रुणहत्या, भ्रष्टाचार अशा अनेक सामाजिक विषयांवर 1200 हून अधिक विषयांवर व्याख्याने दिली आहेत. अनेक कलाकारांच्या नकला, पशुपक्षांचे आवाज, विनोदी किस्से यांच्या अनुषंगाने विविध सामाजिक विषयांवर हसत-खेळत ते प्रबोधन करतात. त्यांना आजवर अनेक पुरस्कार मिळाले आहेत.
कादंबरीकार-आप्पासाहेब खोत
प्राचार्य म्हणून निवृत्त झालेले प्रा. खोत यांनी गवणेर, महापूर, रानगंगा, कळवंड, माती आणि कागद, मरणदारी यासह अनेक कथासंग्रह तसेच पळसफुल, गाव पांढरं, घरपण, फेसाटी, सावलीची सोबत यासह अन्य कादंबऱ्या लिहिल्या आहेत. अनवाणी पाय व कुणब्याची पोरं हा ललित गद्य संग्रह असून देव माणूस, कर्मवीर भाऊराव पाटील यांचे चरित्र त्यांनी लिहिले आहे. त्यांच्या कथांचा मराठी अभ्यासक्रमात समावेश झाला आहे. साहित्य लेखनाबद्दल त्यांना अनेक पुरस्कार मिळाले आहेत. रसिकांनी संमेलनाला उपस्थित रहावे, असे आवाहन स्वागताध्यक्ष अॅड. सुधीर चव्हाण व उपाध्यक्ष डी. बी. पाटील यांनी केले आहे.









