मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांची माहिती
पणजी : वर्ष 2025 च्या वादग्रस्त मसुदा टॅक्सी अॅग्रीगेटर मार्गदर्शक तत्वांवर चर्चा करण्यासाठी आणि त्यावर निर्णय घेण्यासाठी टॅक्सी संघटना आणि आमदारांसह संबंधितांची बैठक दि. 20 ते 25 ऑगस्ट दरम्यान होणार आहे, अशी माहिती मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी दिली. बैठक होईपर्यंत टॅक्सी अॅग्रीगेटरबाबत कोणताही निर्णय घेतला जाणार नाही, असे त्यांनी पुढे सांगितले. राज्यात उबेर आणि ओला सारख्या अॅप आधारित टॅक्सी सेवांना परवानगी देण्यासाठी वाहतूक खात्याच्या मसुदा अॅग्रीगेटर मार्गदर्शक तत्वांवर विरोधी पक्षाच्या आमदारांनी काल बुधवारी विधानसभागृहात उपस्थित केलेल्या चिंतेला उत्तर देताना मुख्यमंत्री बोलत होते.
तत्पूर्वी विरोधी पक्षनेते युरी आलेमाव आणि आमदार कार्लुस फेरेरा, आमदार अल्टोन डी’कॉस्टा, वेन्झी व्हिएगास आणि क्रूझ सिल्वा यांनी स्थानिक टॅक्सी चालकांच्या हिताचे रक्षण करण्यासाठी राज्यात टॅक्सी अॅग्रीगेटर्स मार्गदर्शक तत्त्वांना परवानगी दिली जाणार नाही, याची स्पष्ट हमी सरकारकडून देण्याची मागणी केली होती. मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केले की, सरकारने केवळ मार्गदर्शक तत्त्वे जारी केली नाहीत. राज्यात उबेर अॅप सेवेला परवानगी दिल्याचा आमदार विरेश बोरकर यांचा आरोपही फेटाळून लावला आहे. बोरकर म्हणाले की, राज्यातील उबेरच्या कारवायांमुळे स्थानिक नियमांचे पालन न केल्याबद्दल चिंता निर्माण झाली आहे आणि या संदर्भात पोलिस तक्रारही दाखल करण्यात आली आहे.









