महापालिका आयुक्त शुभा बी. यांची माहिती
बेळगाव : महापालिकेच्या निवृत्त सफाई कामगारांना घरे देण्यासाठी मार्च महिन्याच्या पहिल्या आठवड्यात बैठक घेऊन अनेक वर्षांपासून रेंगाळलेला प्रश्न मार्गी लावण्यात येईल, असे आश्वासन महापालिका आयुक्त शुभा बी. यांनी दिले. मनपातील आयुक्तांच्या कक्षात गुऊवार दि. 27 रोजी सफाई कामगार हितरक्षण समितीची बैठक पार पडली. सदर बैठकीत सफाई कामगारांच्या विविध समस्यांवर सखोल चर्चा करण्यात आली.
महापालिकेने 1973 पूर्वी निवृत्त झालेल्या काही जणांना घरे दिली आहेत. पण, हुबळी-धारवाड महापालिकेने 1977-78 सालापर्यंत निवृत्त झालेल्या कर्मचाऱ्यांनाही घरे दिली आहेत. त्यामुळे बेळगाव महापालिकेनेही 195 सफाई कामगारांना घरे द्यावीत. यासाठी आम्ही जिल्हाधिकारी आणि महापालिकेकडे सातत्याने पाठपुरावा करत आहोत. जिल्हाधिकारी मोहम्मद रोशन यांनी कामगारांना घरे देण्यात येतील, असे सांगितले आहे. असे सफाई कामगार हित रक्षण समितीचे अध्यक्ष व माजी नगरसेवक दीपक वाघेला यांनी बैठकीत सांगितले.
त्यावर आयुक्त शुभा बी. यांनी हुबळी-धारवाड महापालिकेने कशापद्धतीने घरे दिली आहेत, याची माहिती घेण्यात येईल. 7 मार्चनंतर सर्व सफाई कामगारांना बोलावून कुमार गंधर्व रंगमंदिरात बैठक घेण्यात येईल. त्यांना हक्कपत्र देण्याबाबत निर्णय घेण्यात येईल, असे सांगितले. तर आरोग्य विभागाला सर्व कामगारांना तत्काळ संपर्क साधून बैठकीची माहिती देण्याच्या सूचना करण्यात आली. या बैठकीला विजय निरगट्टी, षण्मुख आदियांद्र, आरोग्याधिकारी डॉ. संजीव नांद्रे, पर्यावरण अभियंते आदिलखान पठाण, प्रवीणकुमार खिलारे आदी उपस्थित होते.









